Fortified Rice: 2028 पर्यंत सर्व सरकारी योजनांतर्गत पोषक तांदूळ वितरणास मंत्रिमंडळाची मान्यता!

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्रीय मंत्रिमंडळाने कुपोषण आणि पोषक तत्वांच्या (Fortified Rice) कमतरतेचा सामना करण्यासाठी डिसेंबर 2028 पर्यंत सर्व सरकारी योजनांतर्गत पोषक तांदळाचा (Fortified Rice) पुरवठा सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने जुलै 2024 ते डिसेंबर 2028 या कालावधीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) सह सर्व सरकारी कल्याणकारी योजनांतर्गत पोषक तांदूळ (Fortified Rice) वितरण सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. या उपक्रमाचा उद्देश कुपोषण आणि लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणाली (TPDS) आणि इतर कल्याणकारी योजनांद्वारे पौष्टिक तांदूळ पुरवून देशभरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढणे हे आहे.

2021 मधील स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी सर्वप्रथम नागरिकांच्या पौष्टिक आहारावर भर देताना, त्यांच्यात वाढणारा अशक्तपणा आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेवर लक्ष केंद्रित केले.

लोह, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन बी 12 सारख्या आवश्यक सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध असलेले फोर्टिफाइड तांदूळ, भारतातील कुपोषणाचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, जेथे 65% लोकसंख्येसाठी तांदूळ हे मुख्य अन्न आहे. नियमित आहारात या पोषक तत्व असलेल्या भाताचा समावेश केल्याने अन्नद्रव्यांची कमतरता दूर करण्यात मदत होते, विशेषत: मुले, महिला आणि दारिद्र्यरेषेखालील जनतेच्या.

आर्थिक घडामोडी मंत्रिमंडळ समितीने (CCEA) यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये पोषक तांदूळ  (Fortified Rice) वाटपाच्या देशव्यापी अंमल बजावणीला मान्यता दिली होती, मार्च 2024 पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले होते. तिन्ही टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे, पोषक तांदूळ आता सर्व सरकारी योजनांमध्ये पुरवठा केला जातो, ज्यात एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) आणि PM POSHAN चा समावेश आहे, ज्याला पूर्वी मिड-डे मील योजना (Mid-Day Meal) म्हणून सुद्धा ओळखले जात असे.

2019 आणि 2021 दरम्यान आयोजित केलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-5) नुसार, विविध वयोगटातील लोकांवर आणि उत्पन्नाच्या स्तरांवर परिणाम करणारी ॲनिमिया ही एक गंभीर समस्या आहे. तांदळासारख्या मुख्य खाद्यपदार्थांचे फोर्टिफिकेशन हे अशा आरोग्याविषयी आव्हानांना तोंड देण्यासाठी एक प्रभावी जागतिक धोरण असल्याचे सिद्ध झाले आहे. सरकारी उपक्रमांद्वारा पोषक तांदूळ (Fortified Rice) पुरवठ्याचा हा विस्तार कुपोषण कमी करण्यासाठी आणि एकूण सार्वजनिक आरोग्य सुधारण्याच्या प्रयत्नांना आणखी चालना देईल अशी अपेक्षा आहे.