Ghonas Snake: थंडी म्हणजे घोणस सापांचा मिलन काळ, विषारी दंशापासून रहा सावधान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रातील चार प्रमुख विषारी सापांपैकी एक म्हणजे घोणस साप (Ghonas Snake). हा साप एवढा विषारी असतो की एकदा त्याने तुमच्या हातावर किंवा पायावर चावा घेतल्यास त्याचे विष शरीरातील रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढविते. विषाच्या या गुणधर्मामुळे चाव्यानंतर रक्तातील गुठळ्या करू शकणा‍ऱ्या प्रथिनांचा नाश होऊ लागतो. त्यामुळे चाव्यानंतर जखमेतून भळाभळा वाहणारे रक्त लवकर थांबत नाही. थोड्या वेळाने नाकपुड्या, कानांतून व गुदद्वारातून रक्त स्रवू लागते. एवढेच नाही तर किडनी सुद्धा निकामी होऊ शकते. विषावरती प्रतिविषाचे औषध न मिळाल्यास एका दिवसात मृत्यू सुद्धा ओढवू शकतो.

असे जहाल विष असणारे घोणस साप (Ghonas Snake) थंडीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर दृष्टीस पडायला लागतात. कारण थंडीचा हा कालावधी म्हणजेच घोणस प्रजातीच्या सापांचा मिलन काळ असतो. 

घोणस सापाला कसे ओळखायचे? (How To Identify Ghonas Snake)

घोणसाला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा असतात. घोणस हिरवा, पिवळा, हलका, करडा रंग व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतात. याची लांबी ही तीन ते पाच फूट असते व डोके मोठे, सपटे व त्रिकोणी आणि मानेपासून वेगळे असल्याचे दिसते.

या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे हा साप त्याचे विषाचे दात तोंडात दुमडू शकतो. सावजाला एकदा विषाने मारल्यानंतर बहुतेक सापांना शिकार खाताना विषाचे दात अडचण बनतात. परंतु उत्क्रांतीमध्ये या सापाने आपले विषाचे दात दुमडून घेण्याची कला अवगत केली आहे. त्यामुळे कधीकधी हा साप चावताना विषारी दातांचा उपयोग करीत नाही. याला कोरडा चावा असे म्हणतात.

घोणसाचे फुत्कार एखाद्या कुकरच्या शिट्टीप्रमाणे किंवा मोटारीच्या चाकातील हवा सोडल्यानंतर येणार्‍या  आवाजाप्रमाणे असते. इतर प्रजातींच्या सापांचा तुलनेत घोणस आकाराने मोठा असतो. बेडूक तसेच सरडे व उंदीर मोठ्या प्रमाणावर घोणस सापाचे भक्ष्य असल्यामुळे जमीन व त्या लगतच्या भागात किंवा लोकवस्तीमध्ये देखील हा आढळून येतो. घोणस जातीचा साप हा पहाटे किंवा रात्रीच्या वेळेस जास्त बाहेर फिरतो किंवा दिवसादेखील निर्धास्तपणे फिरत असतो. 

घोणसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो पोटामध्ये अंडी उबवतो व पिल्ले अंड्यांतून बाहेर आल्यानंतर बाहेर काढतो. त्यामुळे कित्येकांचा असा गैरसमज आहे, की घोणस सस्तन प्राण्यांप्रमाणे पिल्लांना जन्माला घालतात.

घोणस सापाच्या चाव्यावर उपाय (Remedy On Ghonas Snake Bite)

घोणस चावल्यानंतर जखमेभोवती कोणत्याही प्रकारची पट्टी लावू नये; असे केल्यास रक्त साखळून चावलेला भाग कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. घोणस चावल्यानंतर लवकरात लवकर व्यक्तीला प्रतिविषाचे औषध देणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. रुग्णास धीर द्यावा, अनेक वेळेस साप विषारी आहे की नाही हे माहीत नसते. अनेक वेळा घाबरून रुग्णाचा मृत्यू होतो. म्हणून रुग्णास मानसिक धीर देणे गरजेच आहे. त्या व्यक्तीस पाणी प्यायला देऊ नये.

error: Content is protected !!