दिवाळी आधीच नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यवतमाळ

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलेली तुटपुंजी भरपाई खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था न केल्यास व भरपाई दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.

याबाबतचे निवेदन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. यंदा पावसाने कधी नव्हे, इतकी शेतकऱ्यांची पाठ धरल्यामुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी विविध स्तरांवर आवाज उठविल्याने नव्या सरकारने कशीबशी नुकसानभरपाई जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. जिल्ह्याला निधीही आला. राज्य सरकारने अनेक दिवस निधी वाटपाच्या सूचनाच दिल्या नाहीत.

ऐनदिवाळीच्या तोंडावर निधी वाटपाचे नियोजन राज्य सरकारने तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांच्याकडे दिले. मात्र, ग्रामसेवक संघटनेच्या आदेशानुसार ग्रामसेवकांनी निधी वाटप प्रक्रियेवर बहिष्कार टाकला आहे. जिल्ह्यातील जवळपास एक तृतीयांश गावांतील शेकडो कोटी रुपयांचे वाटप रखडले आहे.

तलाठी व कृषी सहायक यांच्याकडे असलेल्या गावांतील निधीवाटपाची प्रक्रिया पूर्ण होत आलेली असताना ग्रामसेवक वर्गाकडे असणाऱ्या गावांतील शेतकरी मात्र, वाटच पाहत आहेत. त्यामुळे या गावांतील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे. प्रशासनाने त्वरित मार्ग काढून शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी आधी पैसे जमा करावेत, असे न झाल्यास शेतकरी संघर्ष समिती उपोषणाचा मार्ग अवलंबले, असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे नेते तथा मुंबई बाजार समितीचे संचालक प्रवीण देशमुख, बालू पाटील, आनंद जगताप, प्रा. घनश्याम दरणे आदींनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 

error: Content is protected !!