हॅलो कृषी
शेतकऱ्याचा खरा मित्र..

सोना है ये सोना …! “रक्तचंदन” म्हणजे काय ? का आहे त्याला सोन्यासारखं महत्व ? जाणून घेऊया…

हॅलो कृषी ऑनलाईन : ” सोना है ये सोना …! ” रक्तचंदनासाठी वापरलेला ‘पुष्पा’ चित्रपटातला हा डायलॉग केवळ डायलॉग नाही तर खरंच यात तथ्य आहे. आंध्र प्रदेशाच्या शेषाचलम च्या जंगलात मिळणाऱ्या या लाल चंदनासाठी खरंच अनेकदा रक्तपात झाल्याच्या कहाण्या प्रचलित आहेत. रक्तचंदन म्हणजे नेमके काय ? आंतरराष्ट्रीय बाजारात याला का मागणी आहे ? याबाबतची माहिती आजच्या लेखात घेऊया…

रक्त चंदन म्हणजे नेमकं काय ?
चंदन असा शब्द जरी उच्चारला तरी सुगंधित पांढरे चंदन आपल्या डोळ्यासमोर येते. हे पांढरे चंदन देशातल्या अनेक भागात मिळते. या सुगंधी चंदनाचा वापर धार्मिक कार्यासाठी , सौन्दर्य प्रसाधनांमध्ये पांढऱ्या चंदनाचा वापर केला जातो. आता पाहुयात लाल म्हणजेच रक्तचंदनाबाबत… तर रक्त चंदन हे देखील धार्मिक कार्यासाठी वापरले जाते. त्याचा वापर विशेषतः शैव पंथीयांमध्ये प्रामुख्याने केला जातो. रक्त चंदन म्हणजे काय ? तर हे एक प्रकारचे वृक्ष आहे. ज्याचा आतील भागाचा रंग हा लाल असतो. रक्तचंदनाचे लाकूड हे लाल रंगाचे असते. त्याचे शास्त्रीय नाव ‘टेराकॉर्पस सॅन्टनस’ असे आहे. त्याला शास्त्रीय परिभाषेत ‘सँटलम अल्बम’ असे म्हणतात. पांढऱ्या चंदनाप्रमाणे त्याला सुगंध नसतो.

रक्तचंदनाचा उपयोग
आपल्यापैकी अनेकांच्या घरात पारंपरिक नुसखा म्हणून रक्तचंदनाची बाहुली असेल…तुमच्या घरातल्या आजी आजोबांना विचारलं की ते याबद्दल नक्की सांगतील. रक्त चंदनाचे काही औषधी गुणधर्म आहेत त्यामधील एक म्हणजे ते सूज कमी करते. सुजलेल्या भागावर रक्तचंदन उगाळून लावतात. याशिवाय रक्तचंदनापासून महागडे फर्निचर, सजावटीचे सामान ,सौन्दर्य प्रसाधने , मद्य बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

काय आहे किंमत?
आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता रक्तचंदनाची किंमत तीन हजार रुपये प्रति किलो इतकी आहे.

कोणती गोष्ट रक्तचंदनाला खास बनवते ?
१) रक्तचंदनाचा लाल रंग
२)रक्तचंदन आंध्र प्रदेशच्या तामिळनाडूला लागून असलेल्या चित्तूर, कडप्पा, कुरनूल आणि नेल्लोर या चार जिल्ह्यांत पसरलेल्या शेषाचलमच्या पर्वतरांगांमध्ये आढळते.
३)रक्तचंदनाच्या झाडाची सरासरी उंची ही आठ ते अकरा मीटर असते.
४)हे झाड सावकाश वाढते.
५)लाल चंदनाच्या लाकडाची घनताही अधिक असते.
६) हे रक्तचंदनाचे लाकूड इतर लाकडांपेक्षा अधिक वेगाने पाण्यात बुडते तीच त्याच्या खऱ्या शुद्धतेची ओळख असते.

परदेशात का आहे मागणी ?
रक्तचंदनाला आशियायी देशात जास्त मागणी आहे. चीन ,जपान, सिंगापूर ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमीरात या भागात रक्त चंदनाची मागणी आहे. इतर देशांच्या तुलनेत चीनमध्ये याला जास्त मागणी आहे. चीन मध्ये १७ व्या शतकाच्या मध्यात मिंग वंशाच्या राजवटीत या लाल चंदनाला अधिक मागणी होती. मिंग वंशाच्या शासकांना रक्तचंदनापासून बनलेलं फर्निचर इतके आवडायचे की, त्यांनी शक्य तितक्या ठिकाणाहून ते मागवले होते .एवढंच नाही तर तिथे ‘रेड सँडलवूड म्युझियम’ आहे. या संग्रहालयात रक्तचंदनापासून बनवलेलं फर्निचर आणि शोभेच्या वस्तू आहेत. याशिवाय जपानमध्ये ‘शामिशेन’ हे विशेष वाद्य लाल चंदनाच्या लाकडापासून बनवले जायचे. आणि विवाहामध्ये भेटवस्तू म्हणून दिले जायचे. मात्र हळूहळू ही प्रथा लोप पावत गेली आहे.

आता चंदनाच्या लागवडीविषयी …

–रक्तचंदन किंवा पांढरे चंदन या दोन्ही प्रकारच्या चंदनाची लागवड शेतकऱ्यांना करता येते.
–या दोन्ही प्रकारच्या चंदनाची शेती देशातील अनेक शेतकरी करतात.
–या दोन्ही प्रकारच्या चंदनाची लागवड केल्यानंतर शेतकऱ्याला तलाठ्याकडे जाऊन आपल्या सातबारा वर याची नोंद करून घ्यावी लागते.
–पीक पहाणीच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमच्या शेतात चंदनाची लागवड करीत आहात याची नोंद करू शकता.
–लाल आणि पांढऱ्या चंदनाची रोपे ज्या रोपवाटिकेतून तुम्ही आणता ती अधिकृत असायला हवी . त्याबाबतचा परवाना त्या रोपवाटिकेकडे असायला हवा. अधिकृत रोपवाटिकेतून तुम्ही रोपे खरेदी केल्याची पावती तुमच्याकडे असायला हवी .
–दोन्ही प्रकारच्या शेतीकरिता शासनाकडून अनुदान मिळते.
–रक्तचंदनाच्या लागवडीसाठी वनविभागाची परवानगी लागत नाही तर त्याची नोंद मात्र तलाठी कार्यालयात करावी लागते.
–चंदनाचे लाकूड तयार झाल्यानंतर मात्र झाडे तोडत असताना तुम्हाला वन विभागाची परवानगी घ्यावी लागते .मात्र तुमच्या सातबारा उतारावर त्याची नोंद असल्यामुळे कोणतीही अडचण येत नाही.

error: Content is protected !!