सरकारने 11,644 कोटी रुपयांचं नुकसान करून शेतकऱ्यांना चुना लावलाय : राजू शेट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नुकतेच केंद्र सरकारने अल्पमुदतीच्या कृषी कर्जावरील व्याज सहाय्य योजनेसाठी 34,856 कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिली. यामधून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे अल्पकालीन कर्ज सात टक्के व्याजदराने मिळण्यास मदत होईल. याबाबत सगळीकडे चर्चा असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनतेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. शेतकऱ्यांसाठी केलेली ही घोषणा म्हणजे “११६४४ कोटी रुपयांचं नुकसान करून शेतकऱ्यांना चुना लावलाय” असे शेट्टी यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मधून म्हंटले आहे.

राजू शेट्टी यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली असून त्यांनी त्यात म्हंटले आहे की, “गेल्या पंधरा वर्षांपासून शेतकऱ्यांना अल्पमुदतीच्या पीक कर्जावर दोन टक्के व्याज परतावा अनुदान मिळत होते. सहा महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने ते बंद केले आणि आता 1.5% व्याज परताव्याचा निर्णय झाला म्हणून अनेक जण अभिनंदन करत आहेत. मुळात आमचे दोन टक्के घेऊन 1.5% परत देण्यात दातृत्व कसले? असा सवाल शेट्टी यांनी केलाय. याआधी केंद्र सरकार 46,500 कोटी रुपये व्याज परतावा देत होते. आता 34 हजार 856 कोटी रुपये देणार म्हणजे शेतकऱ्यांचे 11644 कोटी रुपयांचे नुकसान करून शेतकऱ्यांना चुना लावला आहे”. अशा आशयाची पोस्ट राजू शेट्टी यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून केली आहे.

काय आहे केंद्राचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत सर्व वित्तीय संस्थांना अल्पकालीन कृषी कर्जावर 1.5 टक्के व्याज सहाय्य योजना याचा लाभ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेनुसार सर्व वित्तीय संस्थांना ( सार्वजनिक व खाजगी बँका, लघु वित्त बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँका, सहकारी बँका आणि संगणकीकृत प्राथमिक कृषी ऋण समित्या ) वित्त वर्ष 2022-23 ते 2024- 25 साठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या तीन लाख रुपयापर्यंतच्या अल्पमुदतीच्या कर्जावर 1.5% व्याज सहाय्य दिले जाईल. त्यासाठी 34 हजार 856 कोटी रुपयांच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतुदीला मंजुरी देण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!