Groundnut Farming : उन्हाळी भुईमुग लागवड संपूर्ण माहिती; पेरणी कधी करावी? खत, पाणी नियोजन कसं करावं? कोणत्या जातीची निवड करावी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । महाराष्ट्र राज्यात तेल बियांची एकूण नऊ पिके घेतली मजातात. त्यापैकी भुईमूग (Groundnut Farming) हे महत्त्वाचे पीक आहे. राज्यात सन २०१८-१९ कालावधीमध्ये उन्हाळी भुईमुगाची लागवड ०.८५० लाख हेक्टर क्षेत्रावर झाली व त्यापासून १.१७ लाख टन वाळलेल्या शेंगांचे उत्पादन मिळाले. तर सरासरी उत्पादकता १३७६ किलो प्रति हेक्टर इतकी होती. भुईमूग पीक सूर्यप्रकाशाच्या कालावधीला जरी संवेदनक्षम असले तरी भारतात भुईमूग हे पीक खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात घेता येते. खरीपापेक्षा उन्हाळी हंगामात बागायतामुळे पुरेसा ओलावा, भरपूर सूर्यप्रकाश व कोरडे हवामान असल्याने भुईमूग पिकाची वाढ चांगली होते व अपेक्षित उत्पादन मिळते.

भुईमुगाच्या शेंगापासून खाद्यतेल व पेंड मिळते. वेलपाल्याचा उपयोग जनावरांना चारा म्हणून होतो व टरफलापासून हार्डबोर्ड तयार होतो. भुईमूग हे शेंगवर्गीय पीक असल्याने जमिनीची सुपीकता वाढते. भुईमुगामध्ये २६ टक्के प्रथिने ४८ टक्के तेल आणि ३ टक्के तंतुमय पदार्थ असतात. तसेच त्यामध्ये कॅल्शियम, थिओनिन व नायसिन चे प्रमाण चांगले असते. वरील गुणधर्मामुळे भारतासारख्या व प्रामुख्याने शाकाहारी देशात चांगल्या पोषणयुक्त आहाराच्या दृष्टीने भुईमूग हे निसर्गाने दिलेले वरदान आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारतात दरवर्षी खाद्यतेलाच्या एकूण गरजेच्या अंदाजे ५० टक्के गरज आयात केलेल्या तेलापासून भागवली जाते. तेलबियांच्या उत्पादनात आपला देश स्वयंपूर्ण व्हावा या दृष्टीने उन्हाळी भुईमुगाची लागवड सुधारित पद्धतीने होणे गरजेचे आहे.

असा मिळवा मोफत कृषी सल्ला –

शेतकरी मित्रांनो गुगल प्ले स्टोअरला जाऊन आजच Hello Krushi नावाचे अँप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या. इथे शेतीशी निगडित अनेक महत्वाच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. यामध्ये कृषी सल्ला, शेतीसंबंधी बातम्या, कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधन याबद्दल माहिती दिली जाते. तसेच सातबारा उतारा, जमीन नकाशा, बाजारभाव, हवामान अंदाज, सरकारी योजना, जमीन मोजणी, शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री असा अनेक सुविधा Hello Krushi अँप वर देण्यात येतात. आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi डाउनलोड करून या सेवेचे लाभार्थी बना.

भुईमुगाच्या उत्पादनवाढीची ठळक मुद्दे (Groundnut Farming) –

  • सुधारित वाणांची लागवडीसाठी निवड करणे.
  • प्रमाणित बियाण्याचा योग्य प्रमाणात वापर करणे.
  • प्रति हेक्टरी अपेक्षित रोप संख्या राखणे.
  • बुरशीनाशक व जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करणे.
  • खते व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा गरजेनुसार संतुलित वापर करणे.
  • रोग व किड नियंत्रण वेळेत करणे.
  • योग्य पाणी व्यवस्थापन.
  • सिंचांनाच्या आधुनिक पद्धतीचा वापर करणे.

जमीन –

भुईमुगाच्या लागवडीसाठी मध्यम परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमीन योग्य असते. अशा प्रकारची जमीन नेहमी भुसभुशीत राहात असल्याने जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन आऱ्या सहजतेने जमिनीत जाण्यासाठी तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते.

पूर्वमशागत –

भुईमुगाची मुळे, उपमुळे व मुळावरील नत्राच्या गाठींची योग्य वाढ होण्यासाठी तसेच भुईमुगाच्या शेंगा जमिनीत चांगल्या पोसण्यासाठी जमीन भुसभुशीत करून घेण्यासाठी जमिनीची मशागत चांगली होणे आवश्यक आहे. यासाठी खोल नांगरट करून घ्यावी. कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात शेवटच्या कुळवणी अगोदर १० टन प्रति हेक्टरी शेणखत मिसळावे.

पेरणीची वेळ –

उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या वेळात करावी. जमिनीत चांगल्या प्रकारची ओल होताच म्हणजे जमीन ओलावून अथवा पेरणी करून ताबडतोब पाणी द्यावे. बियाण्याच्या चांगल्या उगवणीसाठी रात्रीचे किमान तापमान १८ अंश सेंटिग्रेड पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. पेरणीस जसजसा उशीर होईल तशी उत्पादनात घट येते. तसेच मे महिन्याच्या शेवटी किवा जून महिन्यात काढणी गेल्यास मान्सूनपूर्व पावसापासून धोका होण्याची शक्यता असते.

पेरणी अंतर पेरणी पद्धत भुईमुगाची लागवड ही पेरणी व टोकन पद्धतीने करता येते. भुईमुगाची पेरणी करताना दोन ओळींतील अंतर ३० सेंटिमीटर व दोन रोपातील अंतर १० सेंटिमीटर ठेवावे. उगवण झाल्यावर लगेच नांग्या भराव्यात. उगवणीनंतर रोपांचे कावळे, कबूतरे इत्यादींपासून संरक्षण करावे.

प्रामुख्याने पसऱ्या, निमपसऱ्या तसेच उपट्या अशा तीन जाती आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने उपट्या म्हणजेच (इरेक्ट – बंची) प्रकारच्या जातींची लागवड करावी.

  • एसबी – ११, टीएजी- २४, फुले उन्नती, टीजी-२६, जेएल -२४ (फुले प्रगती) या जाती निवडाव्यात.
  • टीपीजी -४१ ही मोठ्या दाण्याची जात असून, पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, धुळे व अकोला जिल्ह्यांसाठी शिफारस आहे.
  • जे एल -२२० (फुले व्यास) हीसुद्धा मोठ्या दाण्याची जात असून, जळगाव, धुळे व अकोला जिल्ह्यांसाठी शिफारस आहे.
  • जेएल-५०१ हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांसाठी शिफारशीत आहे.
  • जेएल -७७६ (फुले भारती) या जातीची उत्तर महाराष्ट्रासाठी शिफारस आहे.
  • वरील शिफारशीप्रमाणे परिसरात उपलब्ध, उत्पादनक्षमता, उन्हाळी हंगामात वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता या बाबींचा विचार करून जातींची निवड करावी.

इक्रिसॅट पद्धतीने भुईमूग लागवड –

या पद्धतीस रुंद वरंबा व सरी पद्धत असे म्हणतात. ट्रॅक्टरच्या बेड यंत्राच्या साह्याने ९० सेंटीमीटर (०.९० मीटर) रूंदीचे वाफे तयार करून घ्यावे अथवा पूर्व मशागतीनंतर तयार झालेल्या शेतामध्ये १.२० मिटर अंतरावर छोट्या नांगराच्या साह्याने ३० सेंटीमीटर रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात. त्यामुळे ०.९० मीटर रुंदीचे रुंद गादीवाफे तयार होतात. वाफ्याची उंची १५ ते २० सेंटिमीटर ठेवावी. रुंद वाफ्यावर दोन ओळीतील अंतर ३० सेंटिमीटर व दोन रोपातील अंतर १० सेंटिमीटर ठेवून टोकण पद्धतीने भुईमुगाची लागवड करावी. बियाणे खते व इतर मशागत नेहमीच्या पद्धतीप्रमाणे करावी.

इक्रिसॅट पद्धतीचे प्रमुख फायदे –

  • पीक कायम वाफसा स्थितीत ठेवता येते त्यामुळे मुळांच्या जवळ हवा खेळती राहते.
  • जमिनीत पाणी व हवा यांचे प्रमाण संतुलित ठेवता येते, त्यामुळे पिकाची कार्यक्षमता वाढते.
  • तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे सोईस्कर होते.
  • या पद्धतीत पाटाने सुद्धा पाणी देता येते, यासाठी वेगळी रानबांधणी करावी लागत नाही.
  • जास्त झालेले पाणी सरीतून काढून देता येते किंवा
  • पाणी द्यावयाचे झाल्यास सरीतून देता येते.
  • ओळीतील रोपांना चांगला सूर्यप्रकाश मिळतो.
  • भुसभुशीत मातीत शेंगांची वाढ चांगली होते व काढणीच्या वेळेस झाडे सहज उपटली जातात व जमिनीत शेंगा शिल्लक राहात नाहीत.

बियाणे व बीजप्रक्रिया –

पेरणीपूर्वी ८ ते १० दिवस अगोदर शेंगा फोडून पेरणीसाठी बियाणे तयार करावे.फुटके कीडके, साल निघालेले, बारीक बी निवडून काढावे. पेरणीसाठी केवळ टपोरे बियाणे वापरावे. पेरणीकरिता सर्वसाधारणपणे उपट्या वाणासाठी १०० किलो तर मोठ्या दाण्यांच्या वाणासाठी १२५ किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते. नीमपासऱ्या व पसऱ्या वाणासाठी ८० ते ८५ किलो हेक्टरी बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता विचारात घेऊन त्याप्रमाणे वाढीव बियाणे वापरावे.

पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. बुरशीनाशकाच्या बीजप्रक्रिया नंतर १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम व २५० ग्रॅम स्फुरद विरघळणाऱ्या जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करावी. प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे व हे बियाणे पेरणीसाठी लगेच वापरावे.

खत मात्रा –

पूर्वमशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवणीच्या अगोदर हेक्टरी १० टन (२० गाड्या)कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. भुईमुगाला पेरणीच्या वेळी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद खत मात्रा द्यावी. ही खत मात्रा युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट च्या माध्यमातून द्यावयाची झाल्यास ५४ किलो युरिया अधिक ३१२.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावा. स्फुरद सिंगल सुपर फॉस्फेट च्या माध्यमातून दिल्याने भुईमुगासाठी आवश्यक असलेले कॅल्शिअम आणि गंधक ही अन्नद्रव्य पिकास मिळतात. त्याचबरोबर कॅल्शियम व गंधकाच्या उपलब्धतेसाठी ४०० किलो जिप्समचा वापर करावा त्यापैकी २०० किलो जिप्सम पेरणीवेळी तर उर्वरित २०० किलो आऱ्या सुटताना द्यावा.

error: Content is protected !!