हॅलो कृषी
शेतकऱ्याचा खरा मित्र..

Weather Update :आज राज्यातील ‘या’ 5 जिल्ह्यात मुसळधार पाऊस ; पहा कुठे कशी आहे स्थिती ?

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या जवळपास सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस(Weather Update) पडणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. एवढेच नाही तर राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढचे ४,५ दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व इतर काही भागात अती मुसळधार पावसाचे इशारे देण्यात आले आहेत तर कोकणात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

आज या भागाला अलर्ट जारी

आज दिनांक सहा जुलै रोजी रायगड,पालघर , रत्नागिरी ,कोल्हापूर ,सातारा या भागाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर पुणे,ठाणे आणि नाशिक, चंद्रपूर या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर अमरावती अकोला वाशिम यवतमाळ नांदेड परभणी नागपूर गोंदिया गडचिरोली या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

रायगड

रायगड जिल्ह्यात हवामान विभागाचा रेड अलर्ट जरी करण्यात आला आहे. जिल्ह्यात एनडीआरएफ आणि रेस्क्यू टीम सज्ज ठेवण्यात आली असून सावित्री, अंबा, कुंडलिका धोका पातळीच्या खाली वाहत आहेत. महाड, पोलादपूर, माणगावातील 1523 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आले असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूर

कोल्हापुरात पावसाचा जोर कायम असून 27 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील राधानगरी धरणात 84.33 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

रत्नागिरी

राजापूर तालुक्यात पूरस्थिती पाहता अर्जुना नदी धोक्याच्या पातळीवर वाहतेय . बाजारपेठेजवळच्या भागात नदीचं पाणी शिरले आहे. कालवा फुटून 2 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झाले आहे. रत्नागिरीत हवामान विभागाचा रेड अलर्ट जरी करण्यात आलाय. दापोली, मंडणगडमधील जनजीवन विस्कळीत झाले असून किनारपट्टी, खाडीलगत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धोकादायक ठिकाणच्या कुटुंबांचं स्थलांतर करण्याचे काम सुरु आहे.

error: Content is protected !!