हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय कृषी संशोधन संस्थेने (IARI PUSA) हरभरा (High Yield Gram Variety) लागवडीसाठी नवीन सुधारित वाण विकसित केले आहे, जे कमी खर्चात जास्त उत्पादन देण्यास सक्षम आहे. या जातीचे नाव पुसा चना 20211 देसी (Pusa Manav Gram) असे आहे. हरभऱ्याच्या या जातीपासून हेक्टरी 32.9 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते.
सरकार डाळी आणि तेलबियांच्या सुधारित जातींच्या पेरणीला चालना देत आहे जेणेकरून देशात डाळी आणि तेलबियांचे बंपर उत्पादन घेता येईल. हे लक्षात घेऊन कडधान्य पिकांच्या नवीन सुधारित जातीही कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी विद्यापीठांनी विकसित केल्या आहेत. या मालिकेत हरभऱ्याची ही नवीन जात (High Yield Gram Variety) शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. जाणून घेऊ या जातीची वैशिष्ट्ये.
पुसा चना 20211 देसी (Pusa Chana 20211 Desi) जातीची वैशिष्ट्ये
- ही जात 2021 मध्ये केंद्रीय विविधता प्रकाशन समितीने लागवडीसाठी प्रसारित करण्यात आलेली होती.
- हरभर्याची ही जात गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसाठी शिफारस करण्यात आलेली आहे.
- पुसा चना 20211 देशी (पुसा मानव) हरभऱ्याची ही जात 108 दिवसात काढणीला येते.
- ही जात मर रोगास (Fusarium Wilt Resistant Variety) अत्यंत प्रतिरोधक आहे.
- तसेच हे वाण मूळकुज, कॉलर रॉट, आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीला मध्यम प्रतिरोधक आहे.
- या जातीची रब्बी हंगामात वेळेवर पेरणी आणि सिंचनासाठी शिफारस करण्यात आली आहे.
- या जातीच्या 100 बियांचे वजन सुमारे 19.5 ग्रॅम आहे. या जातीमध्ये प्रथिनांचे प्रमाण 18.9 टक्के असल्याचे आढळून आले आहे.
- या देशी जातीचे सरासरी उत्पादन 23.9 क्विंटल प्रति हेक्टर आहे. त्याचे जास्तीत जास्त उत्पादन 32.9 क्विंटल प्रति हेक्टर (High Yield Gram Variety) पर्यंत मिळू शकते.