कसे कराल लिंबूवर्गीय फळांवरील तपकिरी कुज, देठ सडचे व्यवस्थापन ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अधून मधून पाऊस , थंड हवा आणि अपुरा सूर्यप्रकाश यामुळे लिंबूवर्गीय फळांवर विशेषतः आंबिया बहराच्या संत्रा, मोसंबी फळांवर फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आजच्या लेखात आपण याचबाबत माहिती घेऊया…

फायटोफ्थोरा बुरशीच्या प्रादुर्भावाची लक्षणे

१) पानावरील चट्टे लक्षणे :
–पावसाळ्यात जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळांना फायटोप्थोरा या बुरशीचा प्रादुर्भाव सर्वप्रथम होतो.
–यामुळे पाने टोकाकडून करपल्यासारखी व मलूल होतात. अशी पाने हातात घेऊन चुरा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची घडी होते, मात्र पाने फाटत नाहीत. —टोकाकडून झालेले संक्रमण पूर्ण पानावर होऊन पाने तपकिरी काळी होतात.
–नंतर अशी पाने गळून झाडाखाली त्यांचा खच पडतो. फांद्या पर्णविरहित होतात झाड जणू खराटे सारखे दिसते.
–परिणामी, अकाली फळगळ होते. पानावरील चट्टे संक्रमण रोपवाटिकेमधील कलमा तसेच नुकेतच लागवड केलेल्या कलमांवर सुद्धा दिसून पडतात.

२) फळावरील तपकिरी रॉट किंवा फळावरील कुज लक्षणे :
–पानांवर प्रादुर्भाव झाल्यानंतर जमिनीलगतच्या हिरवी असलेली फळे यावर तपकिरी, करड्या डागांची सुरुवात होते.
–फळे एका बाजूने करपण्यास सुरुवात होते.
–फळाच्या हिरव्या सालीस संक्रमण होऊन पूर्ण फळ हे तपकिरी काळ्या रंगामध्ये परावर्तित होते.
–फळे सडून गळतात.
–या फळसडीच्या अवस्थेस तपकिरी कुज (ब्राऊन रॉट) असे म्हणतात.
–फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते.
–तोडीवेळी करड्या रंगाची फळे निरोगी फळात मिसळली गेल्यास निरोगी फळेही सडतात.

फळमाशी

–सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यामध्ये फळमाशीमुळे फळगळ होताना दिसते.
–या किडीची मादी माशी आणि तिच्या अळीमुळे फळांचे नुकसान होते. प्रौढ मादी फळाच्या सालीखाली एक किंवा अनेक अंडी घालते.
–तीन ते पाच दिवसांत अंडी उबल्यानंतर त्यातून मळकट पांढऱ्या रंगाच्या लहान पाय नसलेल्या अळ्या बाहेर पडतात.
— या अळ्या फळामध्ये शिरून, रस व गरावर गुजराण करतात. त्यामुळे फळांचा नाश होतो, त्याची गुणवत्ता घटते.
–अंडी घालतेवेळी पडलेल्या छिद्राच्या भागामध्ये अन्य रोगजंतू किंवा बुरशींचा प्रादुर्भाव होऊन पिवळे डाग पडतात.
–अकाली फळगळ होते. असे फळ दाबले असता फळातून छिद्रे असलेल्या जागेतून रसाचे पिचकारीसारखे फवारे उडतात.

व्यवस्थापन :

१) सर्वप्रथम खाली पडलेल्या पानांची व फळांची विल्हेवाट लावावी. ती शेतात तशीच पडून राहिल्यास रोगाची तीव्रता वाढण्यास मदत होते. प्रसार जलद गतीने होते. बागेतील वाफे स्वच्छ ठेवावेत.
२) बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी बाहेर काढावे. जिथे पावसाचे पाणी साठून राहते, त्या भागात फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव अधिक होतो.
३) प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटील ए.एल.* २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. ही फवारणी झाडाच्या परिघात, खाली पडलेल्या पाने व फळांवरही करावी. त्यामुळे त्यावरील बुरशीचा नायनाट होईल. तसेच जमिनीवरील सक्रिय बीजाणूही नष्ट होण्यास मदत होईल. चांगल्या परिणामासाठी यात अन्य कोणतेही बुरशीनाशक/कीटकनाशक/विद्राव्य खते मिसळू नये.
४) रासायनिक घटकांच्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या नंतर ट्रायकोडर्मा हार्जियानम* १०० ग्रॅम अधिक सुडोमनास फ्ल्यूरोसन्स* १०० ग्रॅम या प्रमाणे १ किलो शेणखतात मिसळून झाडाचे परिघात जमिनीतून द्यावे.

कोलेटोट्रीकम स्टेम एंड रॉट किंवा देठ सुकणे :

–कोलेटोट्रीकम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होते.
–तो भाग काळा पडतो. हा काळा भाग नंतर वाढत जातो. संपूर्ण फळ सडते.
–कोवळ्या फांद्यांवरील पाने सुकणे, वाळणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणे आहेत.
–बरेचदा उशिरा झालेल्या प्रादुर्भावामुळे रोगग्रस्त फळे आकुंचित होतात, काळी पडतात, वजनाने हलकी होऊन कडक होतात आणि दीर्घ काळापर्यंत देठांना लटकत राहतात.

व्यवस्थापन:

कोलेटोट्रीकम बुरशीमुळे होणाऱ्या फळगळीसाठी बोर्डो मिश्रण ०.६ टक्का मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी)* २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.

 

error: Content is protected !!