कसे कराल गहू पिकातील पाणी आणि खत व्यवस्थापन ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या काळात गव्हाच्या चांगल्या वाढीसाठी काटेकोर पाणी व्यवस्थापन आणि आंतरमशागतीवर भर द्यावा. गव्हाची भारी जमिनीत लागवड केलेली असल्यास १८ दिवसांच्या अंतराने हा पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. मध्यम जमिनीसाठी १५ दिवसांच्या अंतराने सात पाळ्या द्याव्यात तर हलक्या जमिनीस १० ते १२ दिवसाच्या अंतराने ८ ते १० पाळ्या द्याव्यात. परंतु, पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्था व या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनावर परिणाम होतो.

पाणी व्यवस्थापन

मुकुटमुळे फुटण्याच्या वेळी (पेरणीनंतर २१-२५ दिवसांनी): या वेळी जमिनीत पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे मुकुटमुळे कमी फुटतात. फुटलेल्या मुळ्या जास्त पसरत नाहीत. फुटवे कमी येतात. गहू काढणीस लवकर येतो. उत्पादनात घट येते.

फुटवे फुटण्याची अवस्था (पेरणी नंतर ५५-६० दिवसांनी): ओंब्या कमी बाहेर पडतात. बाहेर पडलेल्या ओब्यांची लांबी कमी होते. उत्पादनात घट येते.

पीक फुलोऱ्यात येणे (पेरणी नंतर ७०-८०- दिवसांनी): परागसिंचन कमी होऊन दाण्याची संख्या घटते.

दाण्यात चिक भरण्याची वेळ (पेरणीनंतर ९०-१०० दिवसांनी): या अवस्थेत दाणे पोसतात, त्यांचा आकार वाढतो. परंतु, जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार लहान होतो, वजन कमी होते.

दाणे टणक होण्याची अवस्था (पेरणी नंतर ११० दिवसांनी): या अवस्थेत जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार कमी होतो. दाण्यांवर सुरकुत्या पडून प्रत निकृष्ट होते.

आतरमशागतीचे नियोजन

पेरणी नंतर २१ ते ३० दिवसांनी एक खुरपणी आणि कोळपणी करून तण नियंत्रण करावे

गव्हात चांदवेल, हरळी यांसारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता जरूरीप्रमाणे एक किंवा दोन खुरपणी, तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी. आंतरमशागतीमुळे तणांचे नियंत्रण होते. जमिनीत ओलावा टिकून रहातो.

खुरपणीनंतर शिफारशीत मात्रेपैकी उर्वरित नत्राची मात्रा द्यावी. बागायती वेळेवर पेरलेल्या गव्हास खुरपणी झाल्यानंतर (सर्वसाधारणपणे २१-३० दिवसांनी) प्रती हेक्टरी ६० किलो नत्र ( १३० किलो युरिया), बागायती उशिरा पेरलेल्या गव्हास प्रती हेक्टरी ४० किलो नत्र ( ८७ किलो युरिया) द्यावा.

पीक ५५ ते ७० दिवसांचे असताना १९:१९:१९ या विद्राव्य खताची दोन टक्के (१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम १९:१९:१९ ) याप्रमाणे दोन वेळा फवारणी करावी. दाणे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरियाची फवारणी करावी. (१०लि.पाण्यात २०० ग्रॅम युरिया)

स्रोत : ऍग्रोवन

error: Content is protected !!