पीक संरक्षणासाठी ट्रायकोकार्ड, कामगंध सापळ्यांचा वापर कसा कराल ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, कधी ढगाळ हवामान तर कधी जोराचा पाऊस यामुळे पिकांमध्ये विविध किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अशा स्थितीत ट्रायकोग्रामा हा मित्र कीटक पतंगवर्गीय किडींचे व्यवस्थापन क्षमपणे करतो. आजच्या लेखात आपण याच बाबत माहिती घेणार आहोत.

असा करतात वापर

ट्रायकोग्रामाचे प्रयोगशाळेमध्ये संगोपन करून त्यापासून मिळवलेली अंडी शेतामध्ये प्रसारित करता येतात. त्याची अंडी चिकटवलेल्या कार्डला ‘ट्रायकोकार्ड’ असे म्हणतात. साधारण पोस्टकार्डसारख्या दिसणाऱ्या (२० × १० सें.मी.) कागदावर धान्यांमध्ये जाळी करणाऱ्या पतंगाची २० हजार अंडी चिटकवलेली असतात. त्यामध्ये ट्रायकोग्रामा नावाचा लहान परोपजीवी कीटक असतो.

हा गांधील माशीसारखा दिसणारा, पण आकाराने सूक्ष्म ०.४ ते ०.७ मि.मी. असतो. तो शेतात फिरून पिकांची नुकसान करणाऱ्या अळीवर्गीय कीटकांची अंडे शोधून काढतो. त्या किडींच्या अंड्यामध्ये स्वत:चे अंडे टाकतो. या अंड्यातून १६ ते २४ तासांमध्ये अळी बाहेर पडते. ही बाहेर पडलेली अळी साधारण दोन ते तीन दिवस किडीच्या अंड्यातील घटकांवर उदरनिर्वाह करते. यामुळे अंड्यातून नवीन कीड तयार होत नाही. ती अंड्यातच मरते. या साऱ्या प्रक्रियेमध्ये पिकांचे कोणतेही नुकसान होत नाही की पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही. साधारण ७ ते ८ व्या दिवशी ट्रायकोग्रामा प्रौढ किडीच्या अंड्यातून बाहेर पडतो. प्रौढ पुढे २-३ दिवस शेतात फिरून अळीवर्गीय किडीच्या अंड्याचा शोध घेत, त्यात आपली अंडी घालतो. ट्रायकोग्रामाचा जीवनक्रम ८ ते १० दिवसांत पूर्ण होतो.

वापर केव्हा व कसा करायचा?

कापूस, ज्वारी, मका, ऊस, भेंडी अशा पिकांमध्ये पेरणीपासून ४० ते ४५ दिवसांनी अळीवर्गीय किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच २ ते ३ ट्रायको कार्ड प्रति एकरी वापरावे. ट्रायकोकार्डवरील आखलेल्या जागेवर दहा पट्ट्या कात्रीने हळुवार कापाव्यात. हे १० तुकडे वेगवेगळ्या पानांच्या खालील बाजूने स्टेपल करावेत. ट्रायकोकार्ड हे सकाळी किंवा संध्याकाळी शेतात लावावे. हे कार्ड वापरल्यामुळे पतंगवर्गीय किडींचा अंडी अवस्थेत नाश करता येतो.

घ्यावयाची काळजी 

शेतात ट्रायकोकार्डचा वापर केल्यानंतर १० ते १५ दिवस रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करू नये. ट्रायकोकार्ड हे १ सी.सी.चे असावे. त्यावरील पॅरासिटीझमचे प्रमाण ८० ते ९० टक्के असलेच पाहिजे. हे कार्ड तयार झाल्यापासून ३५ दिवसांपर्यंत वापरता येते. ट्रायकोकार्ड खरेदी करताना परोपजीवी कीटक बाहेर पडण्याची तारीख बघून घ्या. त्या मुदतीपूर्वीच वापरा. ट्रायकोकार्ड प्रखर सूर्यप्रकाश, कीटकनाशके, मुंग्या आणि पालीपासून दूर ठेवा. ट्रायकोकार्ड हे कृषी विद्यापीठ किंवा शासनमान्य प्रयोगशाळांकडूनच विकत घ्यावे.

कामगंध सापळा

किडीच्या नैसर्गिक पुनरुत्पादनासाठी नर व मादी पतंगाचे मिलन होणे आवश्यक असते. मादी पतंगाच्या विशिष्ठ अशा गंधाकडे नर पतंग आकर्षित होतात. या तत्त्वाचा वापर करून कीड व्यवस्थापनासाठी फेरोमोन सापळे म्हणजेच कामगंध सापळे तयार केले जातात. त्यांचा वापर प्रामुख्याने तीन प्रकारे करता येतो.
१) कामगंध सापळे वापरून किडींचे सर्वेक्षण करणे. २) मोठ्या प्रमाणात सापळे लावून मोठ्या प्रमाणात किडीचे पतंग सापळ्यात पकडून (मास ट्रॅपिंग) त्यांचा नाश करणे. ३) कीटकांच्या मिलनात अडथळा निर्माण करून त्यांच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेला अटकाव करणे.

सापळा वापरण्याची पद्धत व प्रमाण

सापळ्याच्या प्लॅस्टिक पिशवीचे टोक जमिनीकडे येईल, अशा प्रकारे मजबूत काठीच्या एका टोकाला बांधावा. ती काठी पिकाच्या उंचीच्या एक ते दोन फूट इतकी उंच असावी. दोन सापळ्यामधील अंतर ५० मीटर असावे. सापळ्याच्या वरच्या बाजूला एक छप्पर असते. त्याच्या आतील बाजूला एका खाचेमध्ये लिंग प्रलोभन (ल्युअर) लावले जाते. लिंग प्रलोभन (ल्युअर) पॅकेटमधून काढल्यानंतर साधारणपणे २०-२५ दिवसांपर्यंत त्याचा गंध टिकतो. कामगंध सापळा पीकवाढीच्या सुरुवातीपासून किंवा फुलोरा अवस्थेपासून पाने खाणाऱ्या अळीच्या सर्वेक्षणासाठी ५ व मास ट्रॅपिंगसाठी म्हणजे मोठ्या प्रमाणात नर पतंग आकर्षित करण्यासाठी २० कामगंध सापळे प्रति हेक्टरी शेतात लावावेत. सापळ्यात अडकलेले नर पतंग नष्ट करावेत. अशा प्रकारे कामगंध सापळ्यांचा वापर करून पतंगवर्गीय किडींचा नाश करून पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल. वेगवेगळ्या पिकांमध्ये उदा. कपाशी, सोयाबीन, मका, तूर, वांगी, भेंडी येणाऱ्या विविध पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या ल्युअर वापराव्या लागतात.

किडी प्रजाती अंडी प्रति हेक्टर सोडण्याचे प्रमाण

–कापसावरील बोंड अळ्या ट्रायकोग्रामा चिलोनिस १,५०,००० ४-६ वेळा

–गुलाबी बोंड अळी ट्रायकोग्रामा बॅक्ट्री १,५०,००० ०३

–मक्यावरील लष्करी अळी ट्रायकोग्रामा प्रिटिऑसम १,२५,००० ०३

–उसावरील खोडकिडा ट्रायकोग्रामा चिलोनिस ५०,००० ०६

–नर पतंगांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येणारे ल्युर

किडींचे नाव लिंग प्रलोभन (ल्युअर) पीक

–गुलाबी बोंड अळी पेक्टिनोल्युअर कपाशी

–मक्यावरील लष्करी अळी एफएडब्ल्यू ल्युअर ज्वारी, मका

–तंबाखूवरील पाने खाणारी अळी स्पोडोल्युअर सोयाबीन, कपाशी

–हिरवी घाटे अळी हेक्झाल्युर कपाशी, सोयाबीन, तूर

–ठिबक्यांची बोंड अळी व्हिटल्युअर भेंडी

–शेंडे व फळ पोखरणारी अळी लुसिनल्युअर वांगी

डॉ. संजोग बोकन, ९९२१७५२०००

डॉ. श्रद्धा धुरगुडे, ८८३०७७६०७४

(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Leave a Comment

error: Content is protected !!