गहू,मका,ज्वारी, तुरीसहित इतर पिकांचे कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या काही भागात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. तर काही ठिकाणी बाकी आहे. शिवाय कापूस सोयाबीन भात या पिकांची कापणी मळणी अंतिम टप्प्यात आहे. सद्य हवामान स्थितीत पिकांचे व्यवस्थपन कसे करायचे ? याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

१) गहू : वेळेवर पेरणी करावयाच्या बागायती गहू पिकाची पेरणी लवकरात लवकर संपवावी. वेळेवर पेरणीसाठी त्र्यंबक, गोदावरी, फुले समाधान इत्यादी वाणांपैकी निवड करावी. गव्हाची पेरणी करतांना 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे, याकरिता 192 किलो 10:26:26 + युरिया 67 किलो किंवा 109 किलो डायअमोनियम फॉस्फेट + युरिया 66 किलो किंवा 313 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 84 किलो म्युरेट ऑफ पोटॅश + 109 किलो युरिया प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी.

२) तूर : तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकात फुलगळ व्यवस्थापनासाठी एनएए 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रब्बी भुईमूग पिक पेरणी नंतर तिन ते सहा आठवडयांनी दोन कोळपण्या आणि एक खुरपणी करावी.

३) रब्बी मका : रब्बी मका पिकाची पेरणी नोव्हेंबर पर्यंत करता येते पेरणी 60X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. मका पेरणी करतांना 75 किलो नत्र, 75 किलो स्फुरद व 75 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे आणि 75 किलो नत्र पेरणीनंतर एक महीण्यांनी द्यावे, याकरिता 289 किलो 10:26:26 + युरिया 100 किलो किंवा 500 किलो 15:15:15 किंवा 375 किलो 20:20:00:13 किंवा युरिया 163 किलो + 469 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 126 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी आणि 163 किलो युरिया प्रति हेक्टर पेरणीनंतर एक महीण्यांनी द्यावा. मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

४) रब्बी ज्वारी : रब्बी ज्वारी पिकात पेरणी नंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली कोळपणी करावी.

५) रब्बी सूर्यफूल: रब्बी सूर्यफूल पिकाची पेरणी करून 20 दिवस झाले असल्यास पहिली कोळपणी करावी.

६) कापूस : वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. कापसाच्या झाडावर 40 ते 50 टक्के बोंडे फुटल्यास वेचणी करावी. वेचण्या पंधरा दिवसाच्या अंतराने कराव्यात. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. पहिल्या आणि दूसऱ्या वेचणीचा चांगला आणि कवडी कापूस वेगळा साठवावा. उशीरा लागवड केलेल्या कापूस पिकात लाल्या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 20 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात. उशीरा लागवड केलेल्या कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे, पांढरी माशी) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा पायरीप्रॉक्झीफेन 5% +डायफेन्थुरॉन 25% (पूर्व मिश्रित किटकनाशक) 400 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. उशीरा लागवड केलेल्या कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली किंवा थायोडीकार्ब 75% 400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून फवारावे. उशीरा लागवड केलेल्या कापूस पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

error: Content is protected !!