बदलत्या हवामानाचा रब्बी पिकांवर परिणाम; काय कराल उपाय, वाचा तज्ञांचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये आकाश अंशत: ढगाळ ते ढगाळ राहून दिनांक 14 डिसेंबर रोजी मराठवाडयामध्ये तूरळक ठिकाणी तर दिनांक 15 डिसेंबर रोजी जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा विभागामध्ये पुढील 48 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही त्यानंतर किमान तापमानात 3 ते 5 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्यवस्थापन

१)कापूस : वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. कापसाच्या झाडावरील 40 ते 50 टक्के बोंडे फुटल्यास वेचणी करावी. वेचण्या पंधरा दिवसाच्या अंतराने कराव्यात. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. पहिल्या आणि दूसऱ्या वेचणीचा चांगला आणि कवडी कापूस वेगळा साठवावा. कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेउ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी.

२) तूर : सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रार्दूभाव वाढलेला आहे. तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

३) रब्बी भुईमूग : वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी भुईमूग पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे भुईमूग पिकात मावा, फुलकिडे याचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

४) मका : वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

५) रब्बी ज्वारी : रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

६) रब्बी सूर्यफूल : रब्बी सूर्यफूल फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थमध्ये असतांना पाणी द्यावे.

७) गहू : वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकास राहिलेले अर्धे नत्र 109 किलो यूरिया प्रति हेक्टरी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी देऊन आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. बागायती गहू पिकाची पेरणी केली नसल्यास लवकरात लवकर संपवावी. गव्हाची पेरणी करतांना 154 किलो 10:26:26 + युरिया 54 किलो किंवा 87 किलो डायअमोनियम फॉस्फेट + युरिया 53 किलो + 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश ‍किंवा 87 किलो युरिया + सिंगल सुपर फॉस्फेट 250 किलो + 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी. राहिलेले अर्धे नत्र 87 किलो यूरिया प्रति हेक्टरी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे.

error: Content is protected !!