शेतकऱ्यांची पोरं हुश्शार …! केवळ 75 दिवसात कलिंगडाचे उत्पादन घेऊन केली 13 लाखांची कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याची तरुणाई शिक्षण आणि नोकरीच्या मागे धावताना मोठमोठ्या शहरांची वाट पकडताना दिसते. मात्र एका शेतकऱ्याच्या पोराने शेतीचा ध्यास धरत शेती सुद्धा किती फायद्याची असते हे दाखवून दिले आहे. आपल्या पाच एकर शेतामध्ये या तरुणाने केवळ ७५ दिवसात कलिंगडाचे उत्पादन घेऊन तब्बल १३ लाख ३२ हजार रुपयांची कमाई करीत तरुण शेतकऱ्यांच्या पुढे आदर्श निर्माण केला आहे.

हो तुम्ही अगदी बरोबर वाचलत…शेतीत सुख शोधणारा हा तरुण आहे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील पाटण इथला. सागर पवार असे या तरुण शेतकऱ्याचं नाव … केवळ ७५ दिवसात कलिंगडाचे उत्पादन घेऊन १३ लाख ३२ हजारांची कमाई करणाऱ्या या शेतकऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सागरने बीएससी अ‍ॅग्रीपर्यंतचे घेतले आहे. शेतीची आणि शेतीमध्ये विविध प्रयोग करण्याची सागरला मनापासून आवड आहे. वडिलोपार्जित शेतीमध्ये सागर वेगवेगळे प्रयोग नेहमीच करीत असतो. आपल्या शेतात सागरने कापूस , भाजीपाला कांदा अशी पिके यापूर्वी घेतली आहेत. मात्र पारंपरिक पिके सोडून त्याने आपल्या शेतात वेगळा प्रायोग म्हणून कलिंगडाची शेती करण्याचा निर्णय घेतला.

असे केले कलिंगडाच्या शेतीचे नियोजन
–सागरने सात ते नऊ जानेवारीदरम्यान कलिंगडाची रोपे लावली.
— सात फूट अंतरावर यांत्रिक पद्धतीने ही लागवड करण्यात आली.
–५ एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपर अंथरून ठिबक सिंचन द्वारे पाणी दिले. हा पेपर वापरल्याने पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होण्यास मदत झाली.
–दीड फूट अंतरावर कलिंगडाच्या ५५ हजार रोपांची लागवड केली.
–आठ ते दहा दिवसांच्या अंतराने कलिंगडाला खतांची मात्रा देण्यात आली. पिकांच्या उष्णतेसाठी तीन ते चार टन कोंबडीखत वापरण्यात आले.
–वेलवर्गीय पिकांवर व्हायरस तुडतुडे, मावा या रोगांचा प्रादुर्भाव होतो. हा रोखण्यासाठी त्याने चिकट फळमाशी, लिमडा, नीम ऑईल याचा वापर केला.

अन कष्टाचे झाले चीज …
केलेल्या कष्टाचे परिणाम म्हणून कलिंगडाचे चांगले उत्पादन आले. आता मोठा प्रश्न होता तो मालाच्या विक्रीचा… स्थानिक बाजारपेठेतील सध्याचा दर पाहता सागरने हा शेतमाल स्थानिक बाजारात विकण्याऐवजी दिल्लीच्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधून विविध देशातील बाजारपेठेत कलिंगड विक्रीसाठी पाठवले. सागराने पिकवलेल्या कलिंगडाला दिल्ली , मुंबई , आणि गुजरातमध्येदेखील चांगला प्रतिसाद मिळतो आहे. याबाबत बोलताना सागर आवर्जून सांगतो की , शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन प्रयोग केल्यास हमखास यश मिळतेच.

Leave a Comment

error: Content is protected !!