India drought 2023 : भारतीय हवामान विभाग (IMD) देशातील 718 जिल्ह्यांवर लक्ष ठेवते. त्यापैकी 500 हून अधिक जिल्ह्यांमध्ये सध्या दुष्काळसदृश परिस्थिती आहे. या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते तीव्र दुष्काळाची नोंद झाली आहे. यामुळे शेतीवर परिणाम होऊ शकतो का? किंवा इतर काय समस्या निर्माण होऊ शकतात? याबाबत आपण जाणून घेऊया. भूविज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांच्या मते, एसपीआय हे दुष्काळावर लक्ष ठेवण्याचे मूलभूत साधन आहे. मात्र यावरून दुष्काळाचा अंदाज बांधणे थोडे अवघड आहे. SIP डेटा प्रदेशानुसार बदलू शकतो. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्यापूर्वी बरेच विश्लेषण करणे आवश्यक आहे.
डाउन टू अर्थच्या विश्लेषण अहवालानुसार ही माहिती 20 ऑगस्ट 2023 ते 24 सप्टेंबर दरम्यान हवामान खात्याने जारी केलेल्या मानकीकृत पर्जन निर्देशांक ((SPI) च्या आधारे तयार करण्यात आली आहे. हवामान खाते मानकीकृत पर्जन निर्देशांक ((SPI) च्या माध्यमातून दुष्काळसदृश परिस्थितीचा अभ्यास करते. देशातील 53 टक्के जिल्हे मध्यम दुष्काळी श्रेणीत आहेत. संपूर्ण इशान्य भारत पूर्व भारतातील काही भाग, जम्मू आणि काश्मिर, दक्षिणेकडील महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचे किनापट्टीचे भाग मध्यम कोरड्या किंवा अत्यंत कोरड्या दुष्काळाच्या श्रेणीत आहेत.
यंदा पावसाळ्यात अधूनमधून आणि तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. तसेच मान्सूनने दीर्घ विश्रांती घेतली आहे. पावसाचा सर्वात मोठा खंड ऑगस्ट महिन्यात होता. त्यामुळे भारतातील 70 टक्के भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामानशास्त्रानुसार मान्सूनकाळात पावसाचा खंड म्हणजे सामान्य पावसाच्या दरम्यान पाऊस नसणे. 21 व्या शतकात तिसऱ्यांदा मान्सूनचा सर्वात मोठा खंड ऑगस्ट 2023 मध्ये आला. दि. 7 ते 18 ऑगस्ट दरम्यान पावसाची 36 टक्के तूट होती. यामुळे ऑगस्ट 2023 हा गेल्या 123 वर्षातील कोरडा ऑगस्ट होता.
ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे पिकांना फटका बसणार आहे. 2023 मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 33 टक्के अधिक पिकांची लागवड करण्यात आली. परंतु त्या प्रमाणात उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे याचा शेतीवर किती नकारात्मक परिणाम होईल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. यंदा भात, ऊस, कडधान्य या पिकांची अधिक लागवड झाली आहे. मात्र पावसाची स्थिती पाहता त्यांच्या उत्पादनात गेल्या वर्षीपेक्षा जास्त होईल हे सांगणे कठीण आहे. पिकाच्या उत्पादनात घट झाल्यास पावसाचा अभाव हे प्रमुख कारण असणार आहे.