हॅलो कृषी ऑनलाईन: एकात्मिक भात- मत्स्यपालन पद्धती (Integrated Rice And Fish Farming) ज्याला भात शेतीतील मासेपालन म्हणूनही ओळखले जाते, ही एक जुनी पद्धती आहे ज्यामध्ये मत्स्यपालन (Fish Farming) आणि भातशेती (Paddy Farming)एकत्र करतात. कृषी उत्पादकता आणि शाश्वतता वाढविण्याच्या क्षमतेमुळे या पद्धतीला महत्व प्राप्त झाले आहे. एकात्मिक मत्स्यशेतीचा भातशेतीवर (Integrated Rice And Fish Farming) होणारा परिणाम आणि फायदे (Benefits) याबाबत जाणून घेऊ या.
एकात्मिक भात – मत्स्य पालनाचे फायदे (Integrated Rice And Fish Farming Benefits)
- एकात्मिक भात – मत्स्यपालन पद्धती द्वारे भाताचे उत्पन्न वाढते. माशांच्या मलमुत्रात नायट्रोजन आणि फॉस्फरस सारखे आवश्यक पोषक तत्त्वे प्रदान करतात, ज्यामुळे तांदूळ पिकाची चांगली वाढ होते.
- भात शेतीतील माशांच्या हालचालीमुळे माती हवेशीर होऊन तणांवर नियंत्रण (Weed Control) ठेवण्यास मदत होते. ज्यामुळे भात पिकाची चांगली वाढ होऊन उत्पादन सुद्धा वाढते. एका अभ्यासानुसार एकात्मिक भात मत्स्यपालन पद्धतीमुळे भाताचे उत्पादन (Rice Production) 15 ते 20 टक्क्यांनी वाढते.
- भात खाचरामध्ये मत्स्यशेती केल्याने जमिनीची सुपीकता (Soil Fertility) लक्षणीयरीत्या सुधारते. माशांचा कचरा नैसर्गिक खत (Fish Waste As Natural Fertilizer) म्हणून काम करते जे मातीला सेंद्रिय पदार्थ आणि पोषक तत्वांनी समृद्ध करते. यामुळे रासायनिक खते कमी प्रमाणात लागतात. शाश्वत शेती पद्धतींना चालना मिळते.
- एकात्मिक भात मत्स्य शेतीमुळे (Integrated Rice And Fish Farming) मातीतील सेंद्रिय कार्बन आणि सूक्ष्मजीव यांचे प्रमाण वाढते ज्यामुळे मातीचे आरोग्य सुधारते.
- एकात्मिक भात मत्स्यशेती कीड व्यवस्थापनात (Pest Management) महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. भात खाचरातील मासे कीटक आणि त्यांच्या अळ्यांचे शिकार करतात, ज्यामुळे रासायनिक कीटकनाशकांची गरज कमी होते. ही नैसर्गिक कीड नियंत्रण पद्धत केवळ पर्यावरणाचा समतोल राखण्यातच मदत करत नाही तर शेतकऱ्यांसाठी कीड व्यवस्थापनाचा खर्चही कमी करते. अभ्यासानुसार एकात्मिक भात मत्स्य शेतीमुळे खोड पोखरणारी अळी, तुडतुडे, पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याचे सिद्ध झाले आहे.