हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीतून शाश्वत उत्पादनासाठी आंतरपिके (Intercropping) घेणे ही एक चांगली पद्धत आहे. गेल्या दशकापासून हवामानात झालेला बदल, गारपीट, अवकाळी पाऊस, दुष्काळ, टंचाई यामुळे शेतकर्याचे (Farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत आंतरपीक पद्धतीमुळे दुष्काळाची झळ कमी बसते आणि पाऊसमान योग्य असल्यास हेक्टरी अधिक धान्योत्पादन होते (Intercropping).
आजच्या लेखात तूर पिकासोबत आंतरपीक (Tur Intercropping) घेण्याचे फायदे आणि पद्धती जाणून घेऊ या.
अवर्षणप्रवण भागातील कोरडवाहू (Dryland Farming) क्षेत्रात बाजरी, सूर्यफुल, तूर, उडीद, मूग, हुलगा, मटकी इत्यादी महत्त्वाची खरीप पिके (Kharif Crops) आहेत. अति उथळ जमिनीवर सुधारित गवताबरोबर हुलगा किंवा मटकी आणि उथळ जमिनीत बाजरी किंवा सुर्यफूल + तूर (2:1) ओळी या प्रमाणात आंतरपीक पद्धतीची शिफारस केली आहे.
तुरीत आंतरपीक घेण्याचे फायदे (Intercropping Benefits)
- कमी पाण्यात, कमी कालावधीत, कमी उत्पादन खर्चात तूर किंवा तूर + आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकर्यांना फायदेशीर ठरते.
- पट्टा पद्धतीत तूर पेरणी केल्यानंतर जोड ओळीतील प्रत्येक तुरीच्या झाडास भरपूर सूर्यप्रकाश, मोकळी हवा मिळते,त्यामुळे फुलांचे शेंगांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता वाढते. व उत्पादकतेत वाढ होते.
- तुरीच्या पिकातून जमिनीवर पडणारा पालापाचोळा यापासून मिळणाऱ्या सेंद्रिय खतामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. एकरी अर्धा टन सेंद्रिय खत जमिनीस मिळते.
- तूर पिकामुळे पुढील पिकास एकरी 50 ते 80 किलो नत्र मिळते.
- तुरीच्या वाढीच्या काळात जमिनीवर पालापाचोळयाच आच्छादन तयार होते ,त्यामुळे जमिनीवरील ओल्यावर येणार्या लव्हाळा व इतर तणांचे नियंत्रण होण्यास मदत होते.
- तूर हे कडधान्य पीक असल्यामुळे त्याच्या मुळावरील गाठीत रायझोबियम नावाचे सूक्ष्म जीवाणू असतात ते हवेतील नत्र शोषून जमिनीत गाडतात आणि पुढील पिकास उपलब्ध करून देतात, त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते.
तुरीचे आंतरपीक व्यवस्थापन (Intercrop Management)
पारंपारिक पद्धतीत तुरीच्या दोन ओळीतील अंतर दोन ते अडीच फुट ठेवतात. मात्र त्यामुळे तुरीवरील फवारणी करण्यात अनेक अडचणी येतात. तुरीच्या दोन ओळीत 90 से.मी अंतर आणि 180 से.मी. पट्टा परत पुन्हा 90 से.मी. अंतराच्या तुरीच्या जोडओळी या प्रयोगातून तुरीची उत्पादकता वाढविण्याबरोबरच आंतरपिकांचा लाभ मिळवता येईल. तुरीच्या दोन ओळीत जी सरी पडली जाईल, तिच्यात पावसाचे पाणी मुरेल या ओलाव्याचा तुरीला लाभ होईल. तुरीची मुळे जमिनीत खोलवर जातात, त्यामुळे जमीन भुसभुशीत पोकळ होते.
तूर आंतरपीक पद्धती (Intercropping Method)
- बाजरी +तूर किंवा सुर्यफुल + तूर
कोरडवाहू शेती संशोधन केंद्र,सोलापूर येथे अनेक वर्षाच्या प्रयोगातून बाजरी+ तूर (2:1) किंवा सुर्यफुल+ तूर (2:1) ह्या आंतरपीक पद्धतीमुळे अनुक्रमे 70 आणि 84 टक्के उत्पादनात वाढ झाली आहे.
आंतरपिकातील (Intercropping) बाजरी व सूर्यफुलाचा कालावधी 80 ते 90 दिवसाचा असतो. तर तुरीच्या वाणानुसार 125 ते 160 दिवसांचा राहील. बाजरी अगर सूर्यफुल काढल्यानंतर राहलेल्या कालावधीतील पाऊस, सूर्यप्रकाश,जमिनीतील ओलावा, अन्नद्रव्ये व जागा ह्याचा तुरीच्या वाढीस उपयोग होतो.
बाजरी/सूर्यफुलाची मुळे तंतुमय असल्यामुळे जमिनीच्या वरच्या थरातील ओलावा, अन्नद्रव्याचे शोषण होते. तर तुरीस सोटमूळ असल्यामुळे जमिनीतील खालच्या थरातील अन्नद्रव्ये व ओलाव्याचे शोषण होते. त्यामुळे ती एकमेकास पूरक ठरतात.
- तूर + सोयाबीन
अलीकडच्या काळात तूर + सोयाबीन (1:3 किंवा 1:4) पद्धतीने पेरल्यास दोन्ही पिकांचे चांगले उत्पादन येत असल्याचे दिसून आले आहे. सोयाबीनच्या ओळीमध्ये 30 से.मी. तर दोन रोपांमध्ये 10 से.मी. अंतर ठेवावे आणि सोयाबीनच्या तीन ओळीनंतर एक ओळ तुरीची पेरावी. तुरीच्या दोन ओळीतील अंतर 120 से.मी. येते. तुरीच्या दोन रोपातील अंतर 20 से.मी. ठेवावे. सोयाबीन बियाणे 60 ते 65 किलो प्रति हेक्टर तर 5 किलो तुरीचे बियाणे प्रति हेक्टरला पुरेसे आहे.
बाजरी + तूर अगर सूर्यफुल + तूर या आंतरपीक (Intercropping) पद्धतीत बाजरी/सूर्यफुल काढल्यानंतर मशागत करणे महत्त्वाचे असते. कारण मुख्य पीक निघाल्यानंतर, दुसर्या पिकांकरिता ओळ टिकवून ठेवणे गरजेचे आहे. त्याकरिता पीक काढल्याबरोबर कुळव चालवून तण व धसकटे उपटून काढून तेथेच वाळू द्यावीत.