Intercrops Cultivation: शाश्वत शेतीसाठी महत्त्वाची आहेत आंतरपिके; जाणून घ्या फायदे आणि आव्हाने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आंतरपीक (Intercrops Cultivation) ही संकल्पना तशी शेतीसाठी नवीन नाही. वर्षानुवर्षे शेतकरी त्यांच्या शेतात आंतरपिके घेत आहेत. पोषक तत्वांची आवश्यकता, वाढीचा कालावधी आणि कीड व रोग संबंधी प्रतिकारशक्ती या गोष्टींसाठी एकमेकांना सुसंगत असणार्‍या दोन किंवा अधिक पिकांची एकाच शेतात लागवड करणे यालाच आंतरपीक (Intercrops Cultivation) म्हणतात. आंतरपीक घेण्याचे जसे अनेक फायदे आहेत तसेच या पद्धतीचा अवलंब करताना काही आव्हाने सुद्धा शेतकर्‍यांसमोर उभी राहतात. या लेखात या सर्व बाबींबद्दल जाणून घेऊ या (Intercrops Cultivation).

आंतरपीक घेण्याचे फायदे (Advantages of intercropping)

आंतरपीक (Intercrops Cultivation) घेण्याचे शेतकर्‍यांना अनेक फायदे आहेत त्यातील महत्त्वाचे म्हणजे

  1. अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत: आंतर पिकांमुळे शेतकर्‍यांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. विशेषत: फळझाडे यांसारख्या बारमाही पिकांच्या सुरुवातीच्या काळात भाजीपाला, औषधी वनस्पती किंवा कडधान्ये यासारख्या जलद-वाढणाऱ्या कमी कालावधीच्या पिकांची शेतात लागवड केल्यास शेतकर्‍यांना मुख्य पिकांच्या उत्पादना व्यतिरिक्त आंतरपिकातून अधिकचे उत्पन्न मिळू शकते.
  2. नैसर्गिक कीड नियंत्रण: वेगवेगळ्या प्रकारच्या हानिकारक तसेच मित्र किडी या आंतर पिकांवर  निवास करतात. त्यामुळे पिकांचे नुकसान कमी होते. काही पिके किंवा वनस्पती जसे, झेंडू आणि तुळस हे किडींसाठी नैसर्गिक प्रतिबंधक कीटकनाशके म्हणून देखील कार्य करू शकतात, ज्यामुळे कीटकनाशकांचा अनावश्यक वापर कमी होतो.
  3. मातीचे आरोग्य सुधारते: आंतरपीके मातीतील सेंद्रिय पदार्थ, नत्राचे स्थिरीकरण आणि पोषक घटकांचे प्रमाण वाढवून जमिनीची सुपीकता आणि गुणवत्ता राखण्यास मदत करतात. कोबीवर्गीय पिके तसेच कडधान्ये पिके (leguminous crops) बहुतेक वेळा आंतरपीक म्हणून वापरली जातात. या पिकात वातावरणातील नत्र शोषून घेण्याची क्षमता असते. जे मुख्य पीक आणि त्यानंतरच्या पिकांना फायदेशीर ठरते.
  4. जमिनीची धूप थांबते: आंतरपीक हे जमिनीवर आच्छादन सारखे कार्य करते त्यामुळे मातीची रचना सुधारून जमिनीची होणारी धूप रोखता येते.
  5. जैवविविधता संवर्धन: आंतरपीक कीटक आणि मित्र कीटकांसाठी अधिक वैविध्यपूर्ण निवास  प्रदान करते त्यामुळे जैवविविधता वाढून पर्यावरणात चांगला समतोल निर्माण होतो, कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  6. कमी जोखीम: आंतरपीक घेतल्याने हवामानातील बदल, कीड, रोग किंवा बाजारातील चढउतारामुळे पीक अपयशी होण्याचा धोका कमी होतो. एका वेळी अधिक पिके घेऊन, शेतकरी शेतीतील अनिश्चिततेवर मात करून स्थिर आणि योग्य परतावा सुनिश्चित करू शकतात.

आंतरपीक घेण्यात येणार्‍या अडचणी (Difficulties in Intercrops Cultivation)

आंतरपिकाचे (Intercrops Cultivation) संभाव्य फायदे असूनही, यात काही आव्हाने आणि अडथळे सुद्धा येतात जसे,

गुंतागुंतीचे पीक व्यवस्थापन: एकच पीक घेण्यापेक्षा आंतरपिकांची रचना आणि व्यवस्थापन करण्यासाठी अधिक ज्ञान आणि कौशल्ये आवश्यक आहेत. आंतरपिके घेताना शेतकर्‍यांनी एकमेकांना सुसंगत पिके, त्यांच्या वाढीचा पॅटर्न, लागवडीचे अंतर, आणि कापणीची वेळ, आणि पिकाची एकमेकांना होणारी स्पर्धा यांचा विचार करणे आवश्यक आहे.

यंत्रसामुग्री आणि पायाभूत सुविधांचा अभाव: एकच पिकाची लागवड आणि आंतरपीक पद्धतीसाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि पायाभूत सुविधा या फार वेगळ्या असतात. विविध पिके घेण्यास सक्षम होण्यासाठी शेतकर्‍यांना नवीन किंवा सुधारित उपकरणांमध्ये गुंतवणूक करावी लागेल, जसे की लागवड आणि कापणी यंत्र आणि साठवण सुविधा.

संशोधन आणि विस्ताराचा अभाव: आंतरपीक घेण्यासाठी शेतकर्‍यांना गरजेची विश्वसनीय माहिती, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण अजूनही जास्त प्रमाणात उपलब्ध नाहीत. तसेच आंतरपीक यासंबंधी संशोधन आणि विस्तार यांचा अभाव सुद्धा आहे.

धोरणाचा आणि बाजारातील प्रोत्साहनाचा अभाव: सध्याची सरकारी धोरणे आणि मोनोकल्चरला समर्थन देणाऱ्या बाजारपेठेकडून आंतर पि‍काला चांगला प्रतिसाद मिळत नाही. शेतकर्‍यांना कर्ज, विमा, अनुदान आणि पीक फेरपालट प्रमाणपत्र प्रदान करण्यात अडचणी येऊ शकतात.

काही प्रमुख आंतरपिकांची उदाहरणे (Examples of Some Major Intercrops)

नारळ + केळी + अननस: ही एक लोकप्रिय आंतरपीक पद्धत आहे, ज्यामध्ये मुख्य पीक नारळ आहे. केळी आणि अननस हे आंतरपीक म्हणून घेतले जातात, ज्यामुळे शेतकर्‍यांना अतिरिक्त उत्पन्न आणि अन्न सुरक्षा मिळते. या प्रणालीमुळे जमिनीची सुपीकता आणि पाणी धारण क्षमता वाढते. कीड व्यवस्थापन सुधारते.

आंबा + पेरू + पपई: आंबा या मुख्य पिकात पेरू आणि पपई हे आंतरपीक म्हणून घेतले जातात. पीक वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेमुळे शेतकर्‍यांना वर्षभर उत्पन्न आणि फळ उत्पादन मिळते. यामुळे मातीचे आणि पर्यावरणाचे आरोग्य सुधारते कीटकांचे नैसर्गिक नियंत्रण होते.

ऊस + कडधान्ये: या आंतरपीक पद्धतीत ऊस या मुख्य पिकात सोयाबीन, चवळी आणि तूर यांसारख्या कडधान्य पिकांची लागवड केली जाते. ही कडधान्य पिके नायट्रोजनचे स्थिरीकरण करून  जमिनीची सुपीकता सुधारतात. यामुळे तणांची वाढ, कीटकांचा प्रादुर्भाव आणि सिंचनाची गरज कमी होते.

कापूस + कडधान्ये: कापूस या मुख्य पिकात हरभरा, मूग आणि उडीद यासारखी कडधान्ये आंतरपीक (Intercrops Cultivation) म्हणून घेतली जातात. यामुळे पशुंसाठी प्रथिनेयुक्त चारा आणि खाद्य मिळते. या प्रणालीमुळे जमिनीची सुपीकता व पाण्याची कार्यक्षमता वाढून कीड व्यवस्थापन सुधारते (Intercrops Cultivation).

लेखक: हर्षल जैन (आंतरराष्ट्रीय सेंद्रिय प्रमाणिकरण निरीक्षक)

error: Content is protected !!