आली थंडी…! अशी घ्या फळबागांची नीट काळजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात हिवाळ्यातील तापमान हे १६ अंश सें.ग्रे. च्याही खाली जाते, अशावेळी कमी तापमानाचा फळबागांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. फळबागांच्या उत्तम वाढीकरिता तसेच दर्जेदार उत्पादनाकरिता उपलब्ध हवामानानुसार फळपिकाची निवड करणे अतिशय महत्वाची बाब आहे. कारण वेगवेगळ्या पिकांसाठी कमाल व किमान आणि सरासरी तापमान यांच्या मर्यादा वेगवेगळ्या असतात.

मुख्यतः केळी, द्राक्षे व पपई या पिकांचे कडाक्याच्या थंडीमुळे फार नुकसान होण्याची शक्यता असते. जर तापमान १० अंश सें.ग्रे. पेक्षा कमी कमी असेल तर खालील उपाय अंमलात आणावे.

उपाय

–फळबागेच्या पश्चिम व दक्षिण दिशेला शेवरी, हादगा, पांगरा, मलबेरी, व बांबू या सारख्या प्रतिबंधक वृक्षांची लागवड करावी.

–बागेभोवती सजीव कुंपण लावले नसल्यास थंड वाऱ्यापासून संरक्षणासाठी लागलीच बागेच्या चारी बाजूने दोन ओळीत शेवरी, गजराज गवत, एरंड, गिरिपुष्प अथवा सुरुची दाट लागवड करावी. ह्या बागेत झाडांची सतत निगा राखावी व छाटणी करावी.

–मुख्य फळझाडे जर लहान असतील तर रबी हंगामात मोकळ्या व रांगेतील उघड्या जमिनीच्या पट्ट्यावर दाट पसरणारी पोट पिके घ्यावीत.

–केळी, पपई व पानवेलीच्या बागेभोवती दाट शेवरी लावून सजीव कुंपण तयार करावे.

नियंत्रणाचे उपाय

–थंडीची लाट येण्यापूर्वी हवामान खाते पूर्व सूचना देतात. त्यामुळे थंडीची पूर्वसूचना मिळताच फळबागेमध्ये शक्यतो रात्री अथवा पहाटेच्या वेळेस ठिबक सिंचनाने पाणीपुरवठा करावा कारण विहिरीच्या पाण्याचे तापमान हे कालव्यापेक्षा थोडे जास्त असते आणि त्यामुळे बागेमधील तापमान वाढण्यास मदत होते.

–झाडाच्या खोडापाशी व आळ्यात तण, वाळलेले गवत, पालापाचोळा, उसाचे पाचट, गव्हाचा भुसा अशा सेंद्रिय पदार्थांचे खोडालगत आच्छादन करावे, जेणेकरून कमी तापमानाचा झाडांच्या मुळ्यांवर व कार्यक्षमतेवर परिणाम होणार नाही.

–केळी बागांमध्ये प्रत्येक झाडास खोडालगत एक किलो निंबोळी पेंड द्यावी. यामुळे अन्नद्रव्ये तर मिळतातच परंतु, पेंड कुजतांना त्यापासून उष्णता निर्माण होते आणि बागेतील तापमान सुधारते, याशिवाय सुत्रकृमींचाही बंदोबस्त होतो.

–थंडीचे प्रमाण कमी होईल तोवर फळबागांमध्ये फक्त रोगग्रस्त फांद्याच कापाव्यात. फळबागांची अतिरिक्त छाटणी करू नये. यामुळे फळबागेची थंडीपासून हानी होणार नाही.

–रोपवाटीकेतील रोप, कलमे, बियाण्याचे वाफे यावर तण, वाळलेले गवत, तुराट्याचे खोपट किंवा तट्टे याचे छप्पर उभारावे. असे खोपट/छप्पर सायंकाळी ६ वाजता घालावे व सकाळी सूर्यप्रकाश पडल्यावर काढून घ्यावे. छप्पर करण्यासाठी शक्यतो काळ्या पॉलिथीनचा वापर करावा.

–रात्रीचे वेळी फळबागेत जागोजागी पालापाचोळा किंवा काडीकचरा जाळून धूर करावा. त्यामुळे बागेचे तापमान वाढवण्यास मदत होईल.

–नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा, तसेच पालाशयुक्त खते (म्युरेट ऑफ पोटॅश) किंवा लाकडी कोळशाची राख खात म्हणून दिल्यास झाडाची पाणी व अन्नद्रव्ये शोषणाची व वहनाची क्षमता वाढते.

–नवीन लागवडीसाठी फळझाडांच्या थंडीस प्रतिकारक अशा जाती वापराव्यात. वरील नमूद केलेल्या कमी खर्चिक बाबींचा जर आपण आपल्या फळ बागेमध्ये तापमान नियोजानाकरिता वापर केल्यास आपणास दर्जेदार उत्पादनासह फळबागेचे आयुष्य वाढविण्यास नक्कीच मदत होईल.

संदर्भ : कृषी जागरण

Leave a Comment

error: Content is protected !!