हेलो कृषी ऑनलाईन : हरभरा (Kabuli Chana) हे रब्बी हंगामातील कमी पाण्यावर येणारे कडधान्य पीक आहे. मानवी आहारात या पिकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हरभऱ्याच्या काबुली वाणास बाजारात चांगला दर मिळत असल्याने अनेक शेतकरी काबुली हरभऱ्याची लागवड करतात. हरभऱ्याची पेरणी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत करता येते. काबुली हरभऱ्याच्या वाणांची माहीती आपण जाणून घेऊया.
काबुली वाण (Kabuli Chana)
विराट : हा वाण 110 ते 115 दिवसांत तयार होतो. जिरायतीमध्ये सरासरी 11 क्विंटल प्रति हेक्टर तर बागायती क्षेत्रामध्ये सरासरी 19 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.
अधिक टपोरे दाणे व मर रोगास प्रतिकारक्षम वाण आहे. 100 ग्रॅम दाण्यांचे वजन 35 ग्रॅम मिळते.
कृपा : या वाणाचा कालावधी 105 ते 110 आहे. मर रोगास प्रतिकारक्षम असून सफेद पांढरे दाणे आहेत. बागायतीमध्ये 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते. या वाणापासून जास्त टपोरे दाणे मिळतात.
पीकेव्हीके-2 : हा वाण 100-105 दिवसात काढणीस येतो. मर रोगास प्रतिकारक्षम असून अधिक टपोरे दाणे मिळतात. 100 ग्रॅम दाण्यांचे वजन 40 ग्रॅम मिळते. बागायती क्षेत्रात या वाणापासून सरासरी 16 ते 18 क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन मिळते.
पीकेव्ही- 4 : हा वाण मररोगास प्रतिकारक्षम आहे. या वाणापासून अधिक टपोरे दाणे मिळतात. हा वाण 100 ते 110 दिवसांत तयार होतो. प्रतिहेक्टरी सरासरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन मिळते.
बीडीएनजीके-798 : उभट पसरणारा हा वाण असून मध्यम आकाराचे दाणे असतात. हा वाण मररोग व खुजारोगास मध्यम प्रतिकारक्षम आहे. या वाणाचा कालावधी 110 ते 115 दिवस आहे. या वाणापासून सरासरी 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.