विशेष ग्रामसभेद्वारे आज केसीसी कार्ड होणार उपलब्ध !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी 24 एप्रिल ते 1 मे या कालावधीत “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षा अंतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” ही मोहिम 24 एप्रिल ते 1 मे या कालावधीत देशभरात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्राधान्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

परभणी जिल्हयात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे 3 लाख 3 हजार लाभार्थ्यांपैकी 2 लाख 80 हजार शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले असून 23 हजार नोंदणीकृत लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी 24 एप्रिल रोजी सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष ग्रामसभेत किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज वाटप करण्यात येईल. पात्र शेतक-यांनी विहित नमुन्यात भरलेले अर्ज ग्रामसेवकांच्या मार्फत बँक शाखेमध्ये जमा करावयाचे आहेत.

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या संकल्पनेतून जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी पिक कर्जाची नोंदणी ऑनलाईन करण्यासाठी एक संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली http://parbhani.gov.in/croploan या संकेतस्थळावर कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या मोहिमेदरम्यान शेतक-यांनी या संकेतस्थळामार्फत केसीसी अर्ज दाखल करावेत. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक, नाबार्ड, महसूल, सहकार, ग्रामविकास, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विभाग या सर्व यंत्रणाच्या समन्वयाने मोहिम राबविण्यात येत आहे. यानुसार सर्व संबंधित बँक किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्याच्या विहित कार्य पध्दतीनुसार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज विशेष ग्रामसभेत ग्रामसेवकाच्या मार्फत घेवून त्यांना किसान क्रेडिट कार्ड मंजूर करण्याची कार्यवाही पूर्ण करतील. योजनेतील लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्याची आणि त्यांचे पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असलेले बँक खाते आधार प्रमाणित पेमेंटसाठी अधिकृत करुन घेण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित बँकांना दिल्या असून या माहिमेचा जिल्हयातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!