जाणून घ्या, तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रमुख कडधान्य असलेल्या तुरीचे उत्पादन कमी येण्यामागे किडींचा प्रादुर्भाव व त्यामुळे होणारे नुकसान आढळते. तुरीमध्ये पेरणीपासून काढणीपर्यंत शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी, पाने व फुले जाळी करणारी अळी, शेंगावरील ढेकूण अशा अनेक किडींचा प्रादुर्भाव होतो. पुढे तूर साठवणुकीमध्येही अनेक किडींमुळे नुकसान होते. हे लक्षात घेता तीव्र प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये तूर पिकाचे ७० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान होऊ शकते.

यांत्रिक पद्धत

पाने गुंडाळणाऱ्या अळीची प्रादुर्भावग्रस्त पाने गोळा करून अळीसह नष्ट करावीत. कळी लागण्याच्या अवस्थेत आल्यापासून एकरी २ कामगंध सापळे व २ नरसाळे सापळे पिकाच्या एक फूट उंचीवर लावावेत. त्यावरून शेंगा पोखरणारी अळी व मारुकाची संख्या लक्षात येईल. शक्य असल्यास तुरीवरील मोठ्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात. त्यासाठी झाडाखाली पोते टाकून हलकेसे झाड हलविल्यास अळ्या खाली पडतात. अशा अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. पिकाच्या एक ते दोन फूट उंचीचे हेक्टरी ५० ते ६० पक्षिथांबे उभारावेत.

जैविक पद्धती 

पिकास फुलकळी येऊ लागताच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरॅक्टिन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी. (ॲग्रेस्को शिफारस) शेंगा पोखरणारी हिरवी अळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूजन्य कीटकनाशक ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी सायंकाळी करावी. हे विषाणू अन्नाद्वारे पोटात जाऊन अळीच्या शरीरात वाढतात. परिणामी अळ्यांना रोग होऊन ५-७ दिवसांत अळ्या मरतात.

रासायनिक पद्धत :

किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यावरच रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा.

शेंगा पोखरणारी अळी (घाटे अळी) : कामगंध सापळ्यात सलग २ ते ३ दिवस ८ ते १० पतंग प्रति सापळा किंवा फुलोऱ्याच्या वेळी अथवा फुलोऱ्यानंतर २ अळ्या प्रतिमीटर ओळीत.

शेंगा पोखरणारी अळी व शेंग माशी या किडीची नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी

क्विनॉलफॉस (२५ ई.सी.) २.८ मि.लि. किंवा

फ्ल्यूबेंडायअमाइड (३९.३५ एससी) ०.२ मि.लि. किंवा

इंडोक्झाकार्ब (१५.८ ईसी) ०.६६ मि.लि. किंवा

लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ई.सी.) ०.८ मि.लि.

टीप : वरील कीटकनाशकांना लेबल क्लेम आहे.

महत्त्वाच्या टिप्स :

-पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना जैविक कीटकनाशकाची फवारणी करावी.

-प्रथम व द्वितीय अवस्थेतच शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण करावे.

-फवारणी करताना हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा.

-कीटकनाशकांचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी आहे.

शेंगा पोखरणारी अळी :

इंग्रजी नाव -Pod borer,

शा. नाव- Helicoverpa armigera

बहुभक्षी कीड. सुमारे २०० पिकांवर (तूर, कापूस, भेंडी, टोमॅटो, सोयाबीन, हरभरा आदी) पिकांवर प्रादुर्भाव.

जीवनक्रम- अंडी, अळी, कोष व पतंग.

अळी रंगाने हिरवट पिवळसर. अंगावर तुरळक समांतर रेषा. पूर्ण वाढ झालेली अळी ४ सेंमी. लांब वर्षातून सात ते ९ पिढ्या तयार होतात.

मादी सरासरी ८०० अंडी कोवळी पाने, देठे किंवा कळ्या, फुले, शेंगांवर घालते. चार ते सात दिवसांनी अंड्यातून अळ्या बाहेर पडतात. १४ ते १६ दिवसांपर्यंत पूर्ण वाढ होऊन त्या झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीत मातीच्या वेष्टणात कोषावस्थेत जातात. कोषातून पतंग बाहेर पडतात.

जीवनक्रम ४ ते ५ आठवड्यांत पूर्ण होतो.

नुकसान ः प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्या तुरीची कोवळी पाने खातात. पीक फुलोऱ्यात आल्यावर कळ्यांवर उपजीविका करतात. शेंगांना छिद्र पाडून अर्धे शरीर बाहेर व अर्धे आत ठेवून दाणे खाते. मोठ्या अळ्या दाणे पोखरून खातात.

एक अळी ३० ते ४० शेंगांना नुकसान पोहोचवते. ढगाळ वातावरण आणि जास्त प्रादुर्भावामध्ये पिकाचे २५ ते ७० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.

error: Content is protected !!