लम्पी स्‍किननंतर पशुधनाला लाळ्या खुरकूतचा धोका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : लंपी या जनावरांना होणाऱ्या त्वचारोगानंतर आता राज्यात लाळ्या खुरकूत या रोगाने डोके वर काढले आहे. त्यामुळे पशुपालकांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. पुणे जिल्ह्यातील बोरी आणि आळे (ता.जुन्नर) येथे लाळ्या खुरकूत बाधित पशुधन आढळून आले आहे.

सटाणा (जि. नाशिक) येथून आलेल्या बैलामुळे लाळ्या खुरकूतची लागण झाल्याचे निदान पशुसंवर्धन विभागाला झाले असून, परिसरातील पशुधनाचे तातडीने लाळ्या खुरकूतचे लसीकरण हाती घेण्यात आले आहे. यासाठी तातडीने १२ हजार लसमात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जुन्नर येथील बोरी आणि आळे परिसरात सटाणा (जि.नाशिक) येथून ऊस तोडणी कामगार दाखल झाले आहेत. या परिसरात गेल्या आठवड्यात लाळ्या खुरकूत सदृश आजाराने बैल आजारी आढळले. त्यांचे नमुने तातडीने तपासणीसाठी पाठवले असता, ते पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे या परिसरातील पशुधनाचे तातडीने लसीकरण हाती घेण्यात आले आहे. यासाठी १२ हजार लसमात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी सांगितले.

लसीकरणासाठी सांगली जिल्ह्यातून १२ हजार लसमात्रा मागविण्यात आल्या असून, बाधित गावातील बोरी, आळे, बेल्हे राजुरी या गावांबरोबरच परिसरातील गावांमध्ये लसीकरण मोहीम हाती घेण्यात आल्याचे डॉ. विधाटे यांनी सांगितले.

रोगाची लक्षणे

1) सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत बऱ्याच भागांत लाळ्या खुरकुताच्या साथी येतात. हा रोग खूर विभागलेल्या जनावरांना होतो. हा रोग प्रामुख्याने सांसर्गिक पाणी व चारा खाल्ल्याने होतो.

२) रोगाची लक्षणे म्हणजे जनावरांचे खाणे- पिणे बंद होते. जनावरास ताप येतो. दुधाळ जनावरांत दूध उत्पादनात घट येते. जनावराच्या जिभेवर, टाळूवर व तोंडाच्या आतील भागात फोड येतात. जनावराच्या तोंडातून चिकट तारेसारखी लाळ गळते.

३) पुढील पायांमध्ये खुरांतील बेचकीमध्ये फोड येतात. जनावरांना मागील पायांत फोड तयार झाल्यास अपंगत्व येते. पायाने अधू असलेले पीडित जनावर रोगग्रस्त पाय सारखे झटकत असते.

रोगावरील उपाय

1) या रोगाच्या साथीच्या काळात रोगी जनावरे कुरणात चरण्यासाठी जाऊ देऊ नयेत. रोगाचा प्रसार लाळेतून होत असल्याने आजारी जनावरांनी खाल्लेला चारा इतर जनावरांना खाऊ देऊ नये.

2) आजारी जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी करावीत व त्यांच्यावर औषधोपचार करावा.

3) आजारी जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता वेगळ्या ठिकाणी पाणी पाजावे. रोगी जनावरांची बांधण्याची जागा रोज किमान एकदा जंतुनाशकाने धुवावी.

4) दूध काढण्याची भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावी.

5) लाळ्या खुरकूत रोगावर लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. सर्व जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्‍यतो होत नाही. या रोगाची लस सप्टेंबर आणि मार्च महिन्यात जनावरांना द्यावी.

error: Content is protected !!