सातारा जिल्ह्यात लंम्पीचा प्रादुर्भाव; तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या मंत्री देसाईंच्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी, सातारा

लंम्पी चर्म रोगाचा प्रादूर्भाव कराड, फलटण, सातारा व खटाव तालुक्यातील काही पशुधनाला झाला आहे. हा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

सातारा जिल्ह्यात उद्भवलेल्या लंम्पी चर्म रोग प्रादूर्भावाची सद्यस्थितीचा आढावा श्री. देसाई यांनी मंत्रालय, मुंबई येथून दूरदृश्यप्रणाली द्वारे घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (दूरदृश्यप्रणाली द्वारे), सातारा जिल्हा परिषदेमधून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

देसाई म्हणाले, लंम्पी चर्म रोग उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकित्सालयांमध्ये उपलब्ध आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाधित क्षेत्राच्या 5 कि.मी. परिसरातील पशुधनास तातडीने लसीकरण करावे. ज्या गावांमधील पशुधनास लंम्पी आजारची लागण झाल्याचे समजतात तात्काळ भेट देवून पशुधनास उपचार करावे. यासाठी पशुसंवर्धन विभागाने सज्ज रहावे. लंम्पी आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाकडूनही मदत केली जाईल. जिल्ह्यातील पशुपालकांनी पशुधनास लंम्पी आजाराचे लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून औषधोपचार करावेत, असेही आवाहन राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी केले. जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी जिल्ह्यात लंम्पी चर्म रोगाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

जिल्ह्यात 46 हजार 900 एवढ्या लसमात्रा उपलब्ध असून त्यापैकी 17 हजार 241 लसमात्रांचा वापर करुन पशुधनास लसीकरण करण्यात आले. 26 हजार 659 लसमात्रा शिल्लक असून त्याद्वारे लसीकरणाची कार्यवाही सुरु आहे. तसेच पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडे 2 लाख लसमात्रांची मागणी करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा यांनी यावेळी बैठकीत सांगितले.

error: Content is protected !!