Lumpy Skin Disease : मागच्या वर्षी लम्पीने संपूर्ण राज्यांमध्ये धुमाकूळ घातला होता. त्यानंतर लसीकरण झाल्यामुळे जनावरांमधील लम्पी त्वचा आजाराचा प्रादुर्भाव कमी झाला. मात्र आता पुन्हा एकदा लम्पीने डोके वर काढले आहे. मागच्या काही दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये लम्पीमुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यात देखील लम्पीग्रस्त जनावरांची संख्या वाढू लागली आहे. मागच्या काही महिन्यापासून जिल्ह्यामध्ये 239 गावात 1 हजार 174 जनावरांना लम्पीची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामधील 19 जनावरे गंभीर अवस्थेत असून 53 जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुपालक शेतकरी चिंतेत आहेत. राहुरी, पाथर्डी, कोपरगाव त्याचबरोबर शेवगाव तालुक्यांमध्ये लम्पीचे प्रमाण वाढत आहे.
पशुपालकांनो ही काळजी घ्या
लम्पी त्वचा रोग हा झपाट्याने पसरत आहे. गोठ्यामध्ये एका जनावरा झाला तर दुसऱ्याला लगेच याची लागण होत आहे. त्यामुळे पशुपालकांनी ओटे स्वच्छ ठेवून कीटकनाशकांची फवारणी करावी. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लसीकरणाची मोहीम सुरू केल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉक्टर सुनील तुंबारे यांनी दिली आहे.
मागच्या मे महिन्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात फक्त चार जनावरांना लम्पीची लागण झाली होती. मात्र त्यानंतर पाऊस सुरू झाला की 15 जून नंतर लम्पीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला असल्याचे दिसत आहे. पावसाळ्यामध्ये जनावरांना अनेक रोग होतात त्यामुळे या रोगाचा प्रसार देखील पावसाळ्यामध्ये झपाट्याने होत आहे. पावसाळ्यात कीटक, डास, चिलटे माशांचे प्रमाण वाढू लागले तसेच जनावरातील लम्पी आजार बळावत चालला आहे.
लम्पी आजार म्हणजे काय? जाणून घेऊया थोडक्यात
लम्पी आजाराने पशुपालकी शेतकऱ्यांना चांगले चिंतेत टाकले आहे. शेतकऱ्यांची दुभती जनावरे डोळ्यादेखत मरण पावत आहेत. लम्पी हा एक त्वचारोग असून प्रामुख्याने जनावरांमध्ये आढळत आहे. माहितीनुसार 1929 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये या रोगाचा शोध लागला त्यानंतर 2012-13 मध्ये भारतामध्ये लम्पी आढळला. पहिल्यांदा लम्पी रोगाची सुरुवात ही महाराष्ट्रातील गडचिरोली मध्ये झाली आहे, हा एक संसर्गजन्य रोग असून एका जनावराकडून दुसऱ्या जनावराला होत आहे.