हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडेच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत (5 फेब्रुवारी) ‘मधाचे गाव योजना’ (Madhache Gaav Yojana) राज्यभर राबविण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता ही योजना राज्यभर राबविण्यासाठी राज्य सरकारकडून विस्तृतपणे जीआर (शासन निर्णय) जारी करण्यात आला आहे. या जीआरमध्ये ‘मधाचे गाव योजना’ नेमकी काय आहे? या योजनेची उद्दिष्ट्ये काय आहेत? या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व त्या अनुषंगाने गावाची निवड कशी केली जाते? ही आणि अन्य महत्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता मधाचे गाव योजनेच्या (Madhache Gaav Yojana) माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
काय आहे मधाचे गाव योजना? (Madhache Gaav Yojana Read GR)
राज्यातील अनेक भागांमध्ये शेतीला जोडधंदा म्हणून मधमाशीपालन व्यवसाय सहज करणे शक्य आहे. त्यादृष्टीने अनेक भागांमध्ये पर्यावरणीय अनुकूलता झाडे, झुडपे देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे अशा भागातील शेतकऱ्यांना मधमाशीपालन व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने ही योजना लागू केली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना मधमाशीपालनाचे प्रशिक्षण मिळण्यासह अनुदान मिळण्यास देखील मदत होणार आहे. हे अनुदान प्रामुख्याने शेतकऱ्यांना स्वतःचे 10 टक्के भांडवल तर राज्य सरकारकडून 90 टक्के अनुदान या तत्वावर दिले जाणार आहे.
कशी होणार गावाची निवड?
मधाचे गाव योजनेच्या (Madhache Gaav Yojana) माध्यमातून शेतकऱ्यांना मधमाशीपालन व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक प्रोत्साहन देणे. तसेच ग्रामीण भागातील तरुणांना व शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे. हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. यानुसार या योजनेसाठी निवड झालेल्या एका गावास 54 लाख रुपये इतका निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्य सरकारकडून निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या गावांचे सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतर संबंधित गावाचा मधाचे गाव योजनेत समावेश करण्यासाठी, त्या गावाच्या ग्रामपंचायतीला तसा ठराव ग्रामसभेमध्ये संमत करावा लागेल. त्यानंतर जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीला तो ठराव पाठवला जाईल. त्यानंतर संबंधित गावाची निवड जाहीर केली जाईल.
हेही वाचा : काय आहे ‘मधाचे गाव’ योजना; जिला राज्य मंत्रिमंडळाने दिलीये मंजुरी! (https://hellokrushi.com/madhache-gaav-yojana-approved-state-cabinet/)
गाव निवडीसाठीचे निकष
- निसर्गाच्या सानिध्यात पर्यटनास अनुकुल असलेले गाव असावे.
- सरकारच्या विविध योजना यशस्वीपणे राबविणारे गाव असावे.
- गावामध्ये भौगोलिक दृष्ट्या मधमाशांना पुरक असणारी शेती पिके/वनसंपदा, मुबलक फुलोरा खाद्य असावे. जंगल भागातील गावाला प्राधान्य.
- गावात मधाचे संकलन व व्यवसाय करणारे नागरीक/शेतकरी असावेत.
- “मधाचे गाव” हा नवीन उपक्रम राबविताना लाभार्थी गावांची द्विरुक्ती होऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
- गावात शास्त्रोक्त पध्दतीने मधमाशापालन/मध संकलन करण्याची ग्रामस्थांना आवड असणे गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी वाचा जीआर : (https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402201649512210….pdf)