Maharashtra Vanbhushan Award: चैत्राम पवार ठरले पहिले ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’विजेते

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ (Maharashtra Vanbhushan Award) जाहीर करण्यात आला आहे. धुळ्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 20 लाख रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. ओसाड पाड्याचे नंदनवन करणाऱ्या चैत्राम पवार यांच्या कामाचा वन विभागाकडून गौरव आला आहे. चंद्रपूर येथे आयोजित ताडोबा महोत्सवात 3 मार्च रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल (Maharashtra Vanbhushan Award) मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चैत्राम पवार यांचे अभिनंदन केले आहे.

चैत्राम पवार यांचे योगदान (Maharashtra Vanbhushan Award)

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुर्गम असा बारीपाडा हा वनवासीपाडा आहे. या पाड्याची सन 1992 पूर्वीची परिस्थिती म्हणजे उजाड, ओसाड माळरान ,पिण्यासाठी घोटभर पाणी नाही, अशी होती. पण 1992 नंतर हे चित्र पालटलं आहे. गावात मोठया उमेदीने आणि दुर्दम्य आशावादाने चैत्राम पवार उभे राहिले. त्यांना गावातल्या आदिवासी मावळ्यांनी साथ दिली. या लोक चळवळीची दखल जगाने घेतली. जगातील 78 देशांमध्ये चांगले गाव कसे असावे? याविषयी झालेल्या तज्ज्ञांच्या सर्व्हेमध्ये बारीपाडाने द्वितीय क्रमांक पटकावलाय. त्याचबरोबर बारीपाडा प्रकल्पास अत्यंत मानाचा समजला जाणारा IFAD या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार मिळालेला आहे.

चैत्राम पवार यांनी गावाच्या शेजारी 445 हेक्टर वन जमिनीवर लोकसहभागातून जंगल वनसंवर्धनाचे कार्य  सुरू केले. जैविक विविधता निर्माण करण्यात यश मिळाले. त्यासाठी गावाने गावांसाठी काही कठोर नियम तयार केले. त्यांच्या या कार्यामुळे अनेक प्राण्यांना, पक्षांना हक्काचे जंगल मिळून दुर्मिळ वनौषधी तसेच वनस्पती यांचे संवर्धन झाले.

पाण्याचे दुर्मिक्ष असलेल्या या परिसरात गावक-यांच्या श्रमदानातून 470 पेक्षा जास्त दगडी बंधारे, सलग समतल चर तसेच जंगलातील घनदाट झाडांमुळे पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे या गावांसह परिसरातील आठ गावांना पाणी पुरवठा होत आहे. ऐकाकाळी बारीपाडयासाठी मांजरी गावांतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असे परंतु आता बारीपाडयातून 8 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. पाण्याच्या मुबलक पुरवठयामुळे बागायती पिकांचे प्रमाण वाढले. यात चारसूत्री भातशेती नागली यांचे विक्रमी उत्पादने होऊ लागले. तसेच ऊस, कांदा, बटाटा यासारख्या नगदी पिकांचेही उत्पादन होऊ लागले आहे.

यासोबतच प्रौढांसाठी रात्रशाळा, महिला आणि पुरुष बचतगट, गावात महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्ती, सकस आहार, स्वच्छता, जलसाक्षरता, शौचालयाचा वापर, आरोग्यासबंधी जागृतीचे उपक्रम राबविले जाऊ लागले.

चैत्राम पवार आणि गावकऱ्यांच्या श्रमदानातून दैदिप्यमान बारीपाडा या आदिवासी पाड्याची यशोगाथा आहे. म्हणून चैत्राम पवार यांना महाराष्ट्राचा पहिला वनभूषण पुरस्काराने (Maharashtra Vanbhushan Award) सन्मानित करण्यात येत आहे.

error: Content is protected !!