मका लागवड माहिती : मका हे भारतातील महत्त्वाचे खरीप पीक आहे. देशामध्ये ८० टक्के उत्पादन आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये घेतले जाते. परंतु उत्पादन मात्र कमी झालेले दिसत आहे. मका पिकाचे उत्पादन कमी येण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये अयोग्य वेळी पेरणी, सुधारित/संकरित वाणांचा अभाव, संतुलित खत व्यवस्थापन, पीक संरक्षणाचा अभाव या कारणांमुळे मका पिकाच्या उत्पादनात घट येते. आज आपण मका लागवडीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
लागवडीसाठी योग्य वाण कोणतेॽ
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले समिश्र व संकरित वाण
संकरित वाण- उशिरा पक्व होणारे (१०० ते ११० दिवस) बायो ९६८१, संगम, कुबेर
मध्यम कालावधीत पक्व होणारे (९० ते १०० दिवस) ः राजर्षी, बायो, ९६३७, फुले महर्षी.
समिश्र वाण – चार्यासाठी ‘आफ्रिकन टॉल’ तर स्वीट कॉर्नसाठी ‘फुले मधू’ या वाणाची लागवड करावी.
तसेच अनेक शेतकरी खासगी कंपन्यांकडील वाणांचा लागवडीसाठी वापर करतात. योग्य अनुकूल वाण निवडून मका पिकाची लागवड करावी. शेतकर्यांनी आपल्या परिसरामध्ये जे उपलब्ध वाण आहेत. त्या वाणाची निवड करून त्याचा लागवडीसाठी वापर करावा.
जमिनीची निवड कशी करावीॽ
मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचर्याची अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणशक्ती असलेली जमीन मका पिकासाठी चांगली समजली जाते. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा.
पेरणीची पद्धत –
मका पिकाची पेरणी टोकण पद्धतीने करावी आणि जमिनीत ४ ते ५ सें.मी. खोलीवर करावी. उशिरा ते मध्यम कालावधीच्या वाणांसाठी ७५ × २० सें.मी. अंतरावर तर कमी कालावधीच्या वाणांसाठी ६० × २० सें.मी. अंतरावर पेरणी करावी.
बीजप्रक्रिया कशी करावीॽ
२ ते २.५ ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे. तसेच अॅझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धन २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळून नंतर पेरणी करावी.
खताचे व्यवस्थापन कसे करावेॽ
मका पिकाच्या निरोगी वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये व सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते. यापैकी एखादे जरी अन्नद्रव्ये कमी पडले तर मका पिकाची वाढ होऊ शकत नाही, म्हणून पिकास त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार खते देणे गरजेचे आहे. मका पिकाला शेवटच्या कुळवणीवेळी प्रति एकरी ४ ते ५ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळून द्यावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडले असल्यास शेणखताची आवश्यकता नाही. मका पेरणीवेळी एकरी १६ किलो नत्र, (३५ किलो युरिया), २४ किलो स्फुरद (१५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि १६ किलो पालाश (२७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) ५ ते ७ सें.मी. खोलीवर जमिनीत चांगले मिसळून द्यावे. माती परीक्षणानुसार जस्ताची कमतरता असल्यास पेरणीच्या वेळी ८ ते १० किलो झिंक सल्फेट द्यावे. पेरणीनंतर ३० आणि ४० ते ४५ दिवसांनी प्रत्येकी (१६ किलो नत्र (३५ किलो युरिया) प्रति एकरी मका ओळींपासून १० ते १२ सें.मी. अंतरावर द्यावे.
तण व्यवस्थापन –
पेरणी संपताच अॅट्रझीन (५० %) एकरी १ किलो २०० लिटर पाण्यात द्रावण करावे. पेरणीनंतर लगेचच जमिनीवर फवारावे. मका वाढीच्या सुरुवातीच्या काळात १ ते २ खुरपण्या कराव्यात. गरजेनुसार १ ते २ कोळपण्या कराव्यात.
किडीचे नियंत्रण कसे करावेॽ
मका पिकामध्ये किडीचा प्रादुर्भाव होतो. नियंत्रणासाठी सुरळ्या अळ्यासहित उपटून जाळून टाकाव्यात. ट्रायकोग्रामा चिलोणीस या परोपजीवी किडीचे ३ ते ४ कार्ड प्रति एकरी लावावेत आणि निंबोळी अर्काची ५ % पीक उगवणीनंतर १५ दिवसांनी करावी. तसेच डायमिथोएट (३० ईसी) या कीडनाशकाची १.२ मि.ली. प्रति लिटर या प्रमाणात पिकावर फवारणी करावी.
लष्करी अळीचे नियंत्रण –
लष्करी अळीचा पिकावर प्रादुर्भाव दिसून येताच पोंग्यात वाळू टाकावी. असे केल्याने अळीला वाढीच्या भागातील खाण्यापासून परावृत्त करता येईल व शेंडा तुटणार नाही.
अंड्यावर उपजीविका करणार्या ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकांचे एकरी २० हजार अंडी दहा दिवसांच्या अंतराने ३ वेळा शेतात सोडावीत.
रासायनिक पद्धतीने नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट (५ एसजी) ४ ग्रॅम किंवा थायामिथॉक्झाम (१२.३ टक्के) + लँबडा सायहॅलोथ्रीन (९.५ टक्के झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) ०.५ मि.ली. किंवा क्लोरअण्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एस.सी.) ०.४ मि.ली. किंवा स्पायनेटोरम (११.७ एससी) ०.९ मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.