Micro Irrigation : ‘प्रति थेंब अधिक पीक’ योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्नशील – कृषिमंत्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांना सध्या दुष्काळाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे राज्यात सूक्ष्म सिंचनाची (Micro Irrigation) व्याप्ती वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. ‘प्रति थेंब अधिक पीक’ या सूक्ष्म सिंचन योजनेला शेताशेतामध्ये पोहचवत कमी पाण्यात शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. देशातील एकूण सूक्ष्म सिंचन क्षेत्रापैकी राज्यातील 11 टक्के क्षेत्र हे सूक्ष्म सिंचनाखाली (Micro Irrigation) आहे. असे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचा 11 टक्के क्षेत्र वाटा (Micro Irrigation Scheme In Maharashtra)

कृषी विभागाच्या माहितीनुसार, देशात 2015 -16 पासून 2023-24 या काळात 83 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेती ही सूक्ष्म सिंचनाखाली (Micro Irrigation) आहे. यातील महाराष्ट्राचा वाटा हा 9 लाख 38 हजार हेक्टर (11 टक्के) क्षेत्राचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे देशातील सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र असलेल्या प्रमुख राज्यांपैकी एक आहे. जमिनीतील सर्वधिक पाणी शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे पाणी बचतीसाठी सरकारकडून ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीस प्राधान्य दिले जात आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना कमी पाण्यात अधिक उत्पादन घेणे शक्य होईल, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

‘प्रति थेंब अधिक पीक’ या सूक्ष्म सिंचन योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या समस्यांबाबत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या प्रतिनिधी मंडळाने बैठक घेतली. त्यावेळी मुंडे बोलत होते. या बैठकीला असोसिएशनचे अध्यक्ष जुम्बरलाल भंडारी, उपाध्यक्ष के.एम महामुलकर, सचिव संदीप खैबेकर, कमलेश दास आणि कृषी विभागाचे काही अधिकारी उपस्थित होते.

निधी वितरित करण्याचे आदेश

या बैठकीला उपस्थित असोसिएशनच्या प्रतिनिधींनी ‘प्रति थेंब अधिक पीक’ ही सूक्ष्म सिंचन योजना राबवण्यात येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली. त्यानुसार मुंडे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना योजनेतील अडचणी दूर करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये सूक्ष्म सिंचन योजनेची केंद्र सरकारकडून मिळणारी रक्कम लवकरात लवकर मिळवून, ती तात्काळ वितरित करण्यात यावी. सरकारच्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या मर्यादेत वाढ करण्यात यावी. तसेच सूक्ष्म सिंचन योजनेला अधिक शेतकरी फ्रेंडली करावे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

error: Content is protected !!