Micronutrients: पिकांसाठी संजीवनी सूक्ष्म अन्नद्रव्ये; जाणून घ्या कार्ये आणि फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मागील काही काळात रसायनांचा अतिरिक्त वापर, जमिनीतील अन्नद्रव्यांची (Micronutrients) कमतरता, क्षारांचे वाढते प्रमाण, व इतर पीक लागवड पद्धतीमुळे जमिनीचे आरोग्य खालावले आहे.

अशा परिस्थितीत पिकांच्या अधिक उत्पादनासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये (Micronutrients) ही पिकांना द्रवरूप खताच्या माध्यमातून पीक उत्पादन वाढीमध्ये फरक पडण्यास मदत होईल.

पिकांना सूक्ष्म प्रमाणात लागणारी परंतु अत्यंत आवश्यक असणारी अशी एकूण आठ मुलद्रव्ये आहेत. यामध्ये जस्त, लोह, तांबे, बोरॉन, मॅगनीज, मॉंलिब्डेनम, क्लोरीन आणि निकेल यांचा आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणून समावेश होतो. तर सोडियम, सिलिकॉन, कोबाल्ट आणि व्हॅनाडीयम यांचा हितकारक सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणून उपयोग होतो. आवश्यक सूक्ष्म  अन्नद्रव्ये जरी कमी प्रमाणात लागत असली तरी पिकांचा जीवनक्रम पूर्ण करताना संप्रेरके निर्मिती, हरितद्रव्ये निर्मिती, फुल व फळधारणा, प्रथिने तयार करणे इत्यादी कार्यासाठी आवश्यक असतात. हितकारक अन्नद्रव्यांचा पिकास (Micronutrients) फायदा होतो.

सूक्ष्म अन्नद्रव्ये कमतरतेची कारणे (Causes of Micronutrient Deficiency)

 • जमिनीत सेंद्रिय कर्बाचे कमी प्रमाण
 • रासायनिक खतांचा अधिक आणि असंतुलित वापर
 • संकरित व अधिक उत्पादन देणार्‍या वाणाच्या लागवडीमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे अधिक शोषण आणि वापर होते
 •  पिकांची फेरपालट न केल्यामुळे एकाच प्रकारच्या अन्नद्रव्यांचे अधिक शोषण
 • एकसारखी सलग किंवा बहुपीकचक्र पद्धतीचा अवलंब यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांचे अधिक शोषण
 • कमी निचऱ्याच्या भारी जमिनीत पाण्याचा अतिरिक्त वापर.
 • सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खतांचा अतिशय कमी वापर
 • अति विम्लयुक्त तसेच चुनखडीचे जास्त प्रमाण असणारी जमीन  
 • माती परीक्षण न करणे  

सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्ये (Functions of Micronutrients)

जस्त/झिंक: पिकांच्या जीवनक्रमात ज्या अनेक विविध जैव-रासायनिक क्रिया चालू असतात. त्यामध्ये जस्ताला फार महत्त्व आहे. विकरांचे कार्य, वनस्पती वर्धकांची तसेच संप्रेरकांची निर्मिती आणि प्रथिनेयुक्त पदार्थ निर्माण कार्य यांमध्ये जस्ताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

लोह: हरितद्रव्याची निर्मिती आणि प्रकाश संश्लेषन क्रिया वृध्दिंगत करण्यासाठी लोह उपयुक्त ठरते. लोहामुळे प्रथिनांच्या निर्मितीस चालना मिळते.

मँगनीज: प्रकाशसंश्लेषण, श्वासोच्छवास, आणि नायट्रोजन योग्य पद्धतीने ग्रहण करणे यासाठी मँगनीजचा वापर होतो. पराग उगवण, परागनलिका यामध्ये वाढ होते आणि पिकांची रोगप्रतिकारशक्ति वाढवते. 

तांबे: वनस्पतींच्या वाढीसाठी गरजेचे जैव-रासायनिक क्रियेसाठी आवश्यक घटक, प्रथिनांची तसेच ‘अ’ जीवनसत्वाची निर्मिती करण्यास मदत, पिकांच्या श्वासोच्छवासाच्या क्रियेत तांबे नियंत्रकाचे कार्य बजावते.

बोरॉन: वनस्पतींची वाढ, फुलोरा आणि फळधारणा क्रियांसाठी आवश्यक विविध जैविक पदार्थाची निर्मिती तसेच पिष्टमय पदार्थांची निर्मिती यासाठी आवश्यक. व्दिदल वर्गातील पिकांत प्रथिनांचे प्रमाण तसेच गळित धान्यांमध्ये तेलांचे प्रमाण बोरॉनमुळे वाढते. नत्र स्थिरीकरण क्रियेत बोरॉन उपयुक्त ठरते.

मॉलिब्डेनम: या अन्नद्रव्यामुळे नायट्रेट नत्राचे रूपांतर प्रथिनांमध्ये होते. व्दिदल वनस्पतीत जैविक पध्दतीने नत्र स्थिरीकरण कार्यास चालना देते, नत्र स्थिरीकरण, प्रथिनांची निर्मिती वाढविण्यास मदत करते.

सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारणीचे फायदे (Benefits of Spraying Micronutrients)

 • फवारणीमुळे अन्नद्रव्ये वाया जाण्याचे प्रमाण कमी असते त्यामुळे खर्चही कमी होतो.
 • फवारणीद्वारे दिलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्यक्षमता अधिक असते त्यामुळे ते पिकांना त्वरित उपलब्ध होतात व अपेक्षित परिणाम मिळतात.
 • झाडाला/रोपाला समप्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात त्यामुळे पिकांची एकसारखी व जोमदार वाढ होते.
 • कोणताही जमिनीचा प्रकार, सामू, हंगाम किंवा कोणतेही पीक असले तरी फवारणी करता येते.

सूक्ष्म अन्नद्रव्य निर्मिती केंद्र, पीडीकेव्ही अकोला मार्फत उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्ये (Micronutrients grade)

 1. पीडीकेव्ही द्रवरूप मायक्रो ग्रेड ॥: (भाजीपाला, तृणधान्ये, गळितधान्ये आणि फळपिकासाठी)

प्रमाण: पिकांवर फवारणी साठी दोन वेळा, पहिली शाखीय वाढीच्या अवस्थेत 50 मिली व दुसरी फुलोर्‍यात असताना 100 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. फळ पिकांकरिता  ताण संपल्यानंतर फुले येण्यापूर्वी व फळ धारणेच्या वेळेस फवारणी करावी.

घटक: लोह 2.5 टक्के, जस्त 3 टक्के, बोरॉन 0.5 टक्के, मंगल 1 टक्के, तांबे 1 टक्के,  मॉलिब्डेनम 0.1 टक्के

 • पीडीकेव्ही द्रवरूप मायक्रो ग्रेड X (कडधान्य पिकांसाठी)  

प्रमाण: पिकांवर फवारणीसाठी दोन वेळा, पहिली शाखीय वाढीच्या अवस्थेत 50 मिली व दुसरी फुलोर्‍यात असताना 100 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

घटक: लोह 2.5 टक्के, जस्त 5 टक्के, बोरॉन 0.5 टक्के, मॉलिब्डेनम 0.1 टक्के

 • पीडीकेव्ही द्रवरूप मायक्रो ग्रेड XI (कापूस पि‍कासाठी)

प्रमाण: पिकांवर फवारणीसाठी दोन वेळा, पहिली शाखीय वाढीच्या अवस्थेत 50 मिली व दुसरी फुलोर्‍यात असताना 100 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

घटक: लोह 2.5 टक्के, जस्त 5 टक्के, बोरॉन 0.5 टक्के

error: Content is protected !!