मुरघास म्हणजे उपलब्ध हिरवा चारा कापून बारीक कुट्टी करून हवाबंद पद्धतीने प्लास्टीक पिशवी, किंवा खड्ड्यात मुरविणे. मुरघास तयार करण्यासाठी एकदल तसेच द्विदल चारा पीक वापरता येत असले तरी प्रामुख्याने एकदल चारा पीक वापरली जातात. कडवळ, मका तसेच अनेक एकदल वर्गीय चारा पिकांचा वापर मुरघास तयार करण्यासाठी वापर करावा. सध्या अनेक एकदल चारावर्गीय पिकांचे वाण उपलब्ध आहेत.
जर खड्ड्यात मुरघास करायचा असल्यास 5 फूट रुंद व 5 फूट उंच व गरजेनुसार लांबीचा खड्डा घ्यावा. मुरघासासाठी 30 ते 50 टक्के फुलोऱ्यात पीक असताना कापावे. हिरव्या चाऱ्यातील प्रमाण 65 ते 70 टक्के असावे. यासाठी चारा कापल्यानंतर सावलीत 4 ते 5 तास सुकवावा. चारा खड्ड्यात भरण्यापूर्वी खड्ड्यात 250 ते 300 जी एस एम जाडीचा प्लास्टिक कागद पसरावा. प्लास्टिक कागद पसरावा. चारा कुट्टी यंत्राणे बारीक तुकडे करून खड्ड्यात भरावा. चारा भरताना त्यात प्रति टन 1 किलो मीठ, 1 किलो खनिज मिश्रण वापरावे. यामुळे मुरघासाची प्रत व स्वाद व पौष्टिकता वाढते.
कुट्टीचा प्रथम 1 ते 1.5 फुटाचा थर देऊन दाबावा म्हणजे हवा निघून जाते व बुरशीची वाढ होत नाही. त्यावर मीठ व खनिज मिश्रण टाकूण दुसरा थर द्यावा. अशा प्रकारे चाऱ्याची कुट्टी, मीठ व खनिज मिश्रण यांचे थरावर थर देवून खड्डा भरावा. त्यावर वाळलेला चारा किंवा गवताचा थर देवून प्लास्टिक कागद हवाबंद करावा. 1 घनमीटर फुटामध्ये 15 ते 16 किलो चारा साठवला जातो.
45 ते 60 दिवसात मुरघास तयार होतो. त्यानंतर खड्डा उघडून 15 ते 20 किलो प्रति गाईस याप्रमाणे दररोज मुरघास खाऊ घालावा. यापद्धतीने 6 ते 8 महिने चारा व्यवस्थित साठविता येतो. मुरघासामुळे टंचाईच्या काळात हिरव्या चाऱ्याची जनावरास उपलब्धता होते. वाळलेला चारा साठविण्याऐवजी हिरवा चारा उपलब्ध असेल तर अशा वेळी हिरवा मुरघास तयार करून वर्षभर साठविता येतो. अशाच पद्धतीने बाजारामध्ये मुरघासाच्या पिशव्या मिळतात त्याचा वापरही मुरघास साठविण्यासाठी करता येऊ शकतो.