हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात खरिपात मोठ्या प्रमाणात मुगाची लागवड (Mung Farming) होत होती. मात्र सध्या शेतकऱ्यांचा नगदी पिके घेण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे मुगाच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या काही वर्षात घट पाहायला मिळत आहे. मात्र मुगाचे पीक हे शेतकऱ्यांना मूग उत्पादनासह जमिनीचा पोत वाढविण्यासाठी मदत करते. मुगाचे उत्पादन घेतल्यानंतर त्या जमिनीत जेही पीक घेतले त्यात अधिक उत्पन्न मिळत असल्याचा आजवरचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन मिळवण्यासाठी मूग पेरणी (Mung Farming) करत, जमिनीतील पौषक तत्वांमध्ये वाढ करावी.
जमिनीचा पोत सुधारतो (Mung Farming Double Benefits For Farmers)
शेतीमध्ये प्रामुख्याने खरीप, रब्बी, उन्हाळी अशा तीनही हंगामामध्ये मुगाची लागवड केली जाऊ शकते. महाराष्ट्रात मुख्यतः ताग हे पीक एखाद्या पीक लागवडीपूर्वी जमिनीत गाडण्याचे हिरवळीचे पीक म्हणून वापरले जाते. मात्र, ताग पेरणी प्रमाणेच शेतामध्ये मुगाची पेरणी करून शेतकरी आपल्या शेतामध्ये मुगाच्या पाल्यासह मुगाच्या अवशेषांचा जैविक खत म्हणून उपयोग करु शकतात. यामुळे देशातील मुग उत्पादनवाढीसह जैविक खतामुळे मुगाच्या नंतर पिकाला जैविक घटकांची पूर्तता होते. मुगाच्या झाडाच्या मुळांना असणाऱ्या गाठींमध्ये मोठ्या प्रमाणात जैविक घटक असतात. ज्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. जमिनीत तीच-तीच पीके घेतल्याने, उत्पादन क्षमता कमी होते. अशावेळी शेतकरी मुगाच्या पेरणीतून दुहेरी फायदा मिळवू शकतात. मुगातून आर्थिक फायद्यासह, जैविक घटकांमुळे जमिनीचा पोत सुधारेल.
हेही वाचा : मुगाचे ‘फुले सुवर्ण’ नवीन वाण विकसित; एकाच वेळी शेंगा तोडणीला! (https://hellokrushi.com/mung-variety-fule-suvarna-developed-rahuri/)
हे आहे मुगाचे जैविक लाभ
- मुगाच्या हिरवळीच्या खतामुळे जमिनीतील कार्बनिक पदार्थांची वाढ होते.
- मुगाचे पीक हे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत करते.
- वालुकामय जमिनीत मुगाच्या हिरवळीच्या पिकाची लागवड केल्यास जमिनीच्या पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होते.
- मुगाच्या हिरवळीच्या पिकामुळे पुढील पिकांसाठीचे पोषकतत्वे जमिनीत टिकून राहतात.
- जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते.
- मूग या हिरवळीच्या पिकामुळे पुढील पिकाच्या खतांचा खर्च जवळपास 25 टक्क्यांनी कमी होतो.