हॅलो कृषी ऑनलाईन: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने करडईचे नवीन (New Safflower Varieties) पीबीएनएस 221 (PBNS 221) आणि पीबीएनएस 222 (PBNS 222) वाण नुकतेच विकसित केले आहेत. या वाणाची दिनांक 28 – 29 ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्था (IIOR) येथे आयोजित वार्षिक करडई कार्यशाळेत झोन 1 साठी प्रसारीत करण्यासाठी शिफारस केली आहे. यात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक यांचा समावेश होतो.
पीबीएनएस 221 आणि पीबीएनएस 222 या वाणांमध्ये (New Safflower Varieties) 34 % पेक्षा जास्त तेलयुक्तता आढळून आली आहे, जी यापूर्वीच्या वाणांच्या तुलनेत अधिक आहे. या वाणांद्वारे कोरडवाहू परिस्थितीत 15 क्विंटल/हेक्टर तर सिंचनाच्या परिस्थितीत 18-20 क्विंटल/हेक्टर इतके उत्पादन घेता येते. पीबीएनएस 221 वाणाचे तेल उत्पादन 34 % ( 525 किलो/हेक्टर) तर पीबीएनएस 222 वाणाचे तेल उत्पादन 34.4 % (533 किलो/हेक्टर) आहे. ही दोन्ही वाण पानावरील ठिपके (अॅल्टरनेरिया लीफ स्पॉट) यासारख्या रोगांना मध्यम प्रतिकारक्षम असून सिंचित आणि पर्जन्याधारित अशा दोन्ही प्रकारच्या शेतीसाठी योग्य आहेत. या वाणांमुळे (New Safflower Varieties) करडई शेतीच्या आर्थिक शाश्वततेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील (VNMKV, Parbhani) अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प करडई विभागाने करडई संशोधनामध्ये महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. पर्जन्याधारित शेतीसाठी उच्च उत्पादनक्षम, तेलयुक्त आणि तांत्रिकदृष्ट्या सुधारित करडई वाणांची निर्मिती करण्यावर केंद्राने भर दिला आहे. या संशोधनामधून शारदा, पीबीएनएस 12 (परभणी कुसुम), पीबीएनएस 40 (सेमी स्पायनी), पीबीएनएस 86 (पूर्णा), पीबीएनएस 184 आणि पीबीएनएस 154 (परभणी सुवर्णा) यासारखे वाण मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आहेत. महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील करडई लागवडीच्या 90 टक्के क्षेत्रावर हे वाण घेतले जात आहेत.
या वाणांच्या (New Safflower Varieties) विकासासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. के. एस. बेग यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाल्याबद्दल केंद्राने कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच या वाणांच्या निर्मितीत सहभागी शास्त्रज्ञांचे कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांनी अभिनंदन केले आहे. यामध्ये डॉ. एस. बी. घुगे, डॉ. आर. आर. धुतमल, करडई शास्त्रज्ञ, तसेच अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पातील वैज्ञानिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.