हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये सध्या तंत्रज्ञान आणि विविध पीक पद्धतीचा (Nilgiri Farming) अवलंब केला जात आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होत आहे. शेतकरी आता पारंपरिक पिकांना फाटा देत मोठ्या प्रमाणावर फळबाग आणि फुल शेती तसेच भाजीपाला पिकांकडे वळत आहेत व त्यासोबतच शेळी पालन तसेच पशुपालन सारखे जोडधंदे तंत्रज्ञानाच्या मदतीने करू लागल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होताना आपल्याला दिसत आहेत. अशातच आता काही शेतकरी हे वृक्ष लागवडीकडे (Nilgiri Farming) देखील वळत आहेत.
निवृत्तीनंतर निलगिरीची लागवड (Nilgiri Farming Gadchiroli Farmer)
गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड येथील शेतकरी सुरेंद्र तावडे यांनी देखील असाच काहीसा मार्ग निवडला आहे. शेतकरी सुरेंद्र तावडे हे भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर, त्यांनी त्यांच्या तीन एकर जमिनीमध्ये निलगिरीची लागवड (Nilgiri Farming) केली असून, ते या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धान पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु, धान हे पारंपरिक पिक न घेता सुरेंद्र तावडे यांनी शेताच्या बांधांवर व शेतामध्ये 2018 साली निलगिरीची लागवड केली. सध्या त्यांची ही झाडे पाच वर्षाची झाली असून, त्यांची उंची दहा ते बारा फुटांपर्यंत झालेली आहे.
किती मिळतंय उत्पन्न?
सुरेंद्र तावडे यांनी 2018 मध्ये निलगिरीची लागवड केली होती व तेव्हापासून त्यांनी खत किंवा पाणी तसेच फवारणी व इतर गोष्टीसाठी खर्च केलेला नाही. मात्र, यंदा चार वर्षांनी त्यांनी नुकतीच पहिली कंपनी केली. त्यात त्यांना एक लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान, जसेजसे झाडी विकसित होत जातील तसेतसे दर दोन वर्षांनी कटिंग करून, प्रत्येक वर्षापेक्षा दुपटीने या उत्पन्नात वाढ होत राहील व विशेष म्हणजे यासाठीचा खर्च मात्र शून्य राहिल, असे निलगिरीच्या वन शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत शेतकरी सुरेंद्र तावडे यांनी सांगितले आहे.
उत्पादन खर्च शून्य
शेतकरी सुरेंद्र तावडे सांगतात, वनशेतीसाठी ज्याही झाडांची लागवड केली जाते. त्या झाडांसाठी रासायनिक खते तसेच कीटकनाशके इत्यादींसाठी शेतकऱ्यांना अजिबात खर्च करावा लागत नाही. या प्रकारची शेती दोन वर्षांनी कमी जागेमध्ये लाखोंचे उत्पन्न देते व त्यामुळे ही एक नफ्याची शेती आहे. वनशेतीमध्ये फक्त वन वृक्षाचे गुणवत्ता व जमिनीचा प्रकार यानुसार निवड करणे खूप गरजेचे आहे. अशाप्रकारे जर व्यवस्थापन केले तर वनशेती खूप फायद्याची ठरू शकते.