हॅलो कृषी ऑनलाईन: द्विदलवर्गीय, जनावरांच्या आवडीचा पौष्टिक चारा (Nutritious fodder crop) पीक म्हणजे ‘लसूण घास’.या चाऱ्याला इंग्रजीत ‘ल्युसर्न’(Lucerne grass) किंवा ‘अल्फाल्फा’(alfalfa) या नावाने सुद्धा ओळखतात.
लसूण घास चाऱ्यामध्ये (Nutritious fodder crop) मोठ्या प्रमाणात प्रथिने, काष्ठमय तंतू, कर्बोदके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळतात. या चाऱ्यामध्ये १८ ते २० टक्के प्रथिने, २.० टक्के स्निग्धांश, २५ टक्के तंतू, २९ टक्के कर्बोदके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, उपयुक्त आम्ले तसेच अ आणि ड जीवनसत्त्व (Nutrients) मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या चारा पिकाला विशेष महत्व आहे.
हे पीक तीन वर्षापर्यंत शेतात टिकते. दरवर्षी १२ ते १५ कापण्या मिळतात ज्यातून सरासरी १०० ते १२५ टन हेक्टरी हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. या चारा पिकाच्या लागवडीतील महत्वाचे मुद्दे जाणून घेऊ या. ((Nutritious fodder crop))
- या चारा पिकाला मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, तसेच सामू ७.५ ते ८ दरम्यान असणारी जमीन चांगली मानवते. ऑक्टोबर- नोव्हेंबर हा कालावधी लागवडीसाठी योग्य समजला जातो.
- हे पीक जमिनीत तीन वर्षांपर्यंत टिकणारे असल्यामुळे जमिनीची चांगली मशागत ( Land Preparation) करावी लागते.
- या पिकास भरपूर प्रमाणात भरखते व वरखते Fertilizer Management) देणे गरजेचे आहे. मशागतीच्या वेळी हेक्टरी १५ ते २० टन शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणीपूर्वी २० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व ५० किलो पालाश या रासायनिक खतांची प्रति हेक्टरी मात्रा द्यावी. त्यानंतर दर तीन ते चार कापण्यांनंतर हेक्टरी ५० किलो स्फुरद खताची मात्रा द्यावी.
- लागवडीसाठी आरएल-८८, आनंद-२, आनंद-३, को-१ सुधारित जातींची ( Improved variety) निवड करावी.
- ओळीत पेरणी केल्याने खते देणे सोपे जाते. हात कोळप्याने आंतरमशागत करता येते. ओळीत बियाणे पेरणी करण्या अगोदर जमिनीमध्ये वाफे तयार करून घ्यावेत, जमिनीच्या उतारानुसार साधारणपणे ३ ते ५ मीटर रुंद व १० मीटर लांबीचे वाफे तयार करावेत. त्यानंतर एक फूट अंतरावर काकऱ्या पाडाव्यात.
- दोन ओळींत एक फूट अंतर ठेवून ओळीत बियाणे पेरणी केली असता हेक्टरी २५ किलो एवढेच बी पुरेसे होते. ओळीतील पेरणीमुळे हातकोळपणी यंत्राने कमी खर्चात तणनियंत्रण करता येते. पेरणीपूर्वी १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियमची बीजप्रक्रिया करावी.
- बी पेरल्यानंतर पहिले पाणी हळुवार द्यावे. जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तुषार सिंचनाने पाणी देणे फायद्याचे ठरते.
- लसूण घासाची (Nutritious fodder crop) पहिली कापणी (harvesting) पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी करावी. पहिल्या कापणीनंतर दर २२ ते २५ दिवसांनी कापणी करावी. कापणी जमिनीपासून ५ ते ६ सें.मी. उंचीवर करावी. कापणी करताना पीक उपटून येणार नाही याची काळजी घ्यावी.
- शेवटच्या कापणीनंतर पिकाला ५ ते ६ दिवस पाण्याचा ताण देऊन खुरपणी करावी. पाणी देण्यापूर्वी हेक्टरी १०० किलो स्फुरदची मात्रा द्यावी.
- पाणी देऊन पीक बियाण्यासाठी सोडावे. लसूण घासाचे पीक (Nutritious fodder crop) ५० टक्के फुलोऱ्यात आल्यानंतर २ टक्के डाय अमोनियम फॉस्फेटची फवारणी करावी. त्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने पुन्हा २ टक्के डाय अमोनियम फॉस्फेटची दुसरी फवारणी करावी. यामुळे बियाणे उत्पादनात (Seed Production) २० टक्के वाढ होते.
(लसूण घास या चारा पिकाचे बियाणे शेतकऱ्यांना विविध कृषी सेवा केंद्र, ऑनलाईन कृषी व इतर खरेदी विक्री वेबसाईट, तसेच विद्यापीठात मिळू शकेल)