हॅलो कृषी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी (Onion Export) उठवली. सरकारने 40 टक्के उत्पादन शुल्क लावून कांद्याची निर्यात खुली केली. मात्र, आता काही तांत्रिक कारणास्तव कांदा निर्यातीचे तब्बल 400 कंटनेर मुंबईत अडकून पडले आहेत. जेएनपीटी आणि कस्टम विभागाचे संकेतस्थळ अद्ययावत न झाल्यामुळे हे कंटेनर मुंबईतील बंदरावर अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. कंटेनर खोळंबल्याने जहाज व्यावसायिकांना देखील फटका बसला आहे. इतकेच नाही तर निर्यातदार व्यापाऱ्यांना देखील याचा मोठा फटका (Onion Export) बसला आहे. दरम्यान, सरकारने ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी केली जात आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान (Onion Export From India)
कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारने कांदा निर्यात (Onion Export) बंदी केली होती. पुढे ही निर्यातबंदी 31 मार्च 2024 नंतर देखील वाढवण्यात आली. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. कांद्याचे भाव झपाट्याने खाली आल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. परिणामी, सरकारने कांद्यावरील निर्याबंदी हटवावी, अशी मागणी केली जात होती. विरोधकांनी देखील या मुद्द्यावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.
निर्यात खुली मात्र कांदा पडून
ज्यामुळे लोकसभा निवडणुकीत या फटका बीजेपीला सहन करावा लागू नये. यासाठी अखेर तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्याबंदी हटवण्याचा निर्णय घेतला. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. निर्यातबंदी हटवताना केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के उत्पादन शुल्क देखील लागू केले. आता शेतकऱ्यांनी कांद्याची निर्यात सुरू केली आहे. मात्र, त्यानंतरही शेतकऱ्यांच्या अडचणी काही सुटता सुटत नाहीये. तांत्रिक कारणामुळे कांद्याचे तब्बल 400 कंटनेर मुंबईतील बंदरावरच अडकले आहेत. ज्यामुळे निर्यात खुली होऊनही अद्यापपर्यंत कांदा निर्यात होऊ शकलेली नाही. त्यामुळे आता सरकारकडे ही तांत्रिक अडचण दूर करण्याची मागणी होत आहे.