Onion Export : अखेर 150 दिवसांनी भारतीय कांद्याची विदेशवारी; निर्यातीतील तांत्रिक अडचण दूर!

0
1
Onion Export From India
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने 8 डिसेंबर 2023 रोजी कांदा निर्यातबंदीचा (Onion Export) निर्णय जाहीर केला होता. प्रामुख्याने त्यानंतर 31 मार्च 2024 पासून निर्यातबंदी सरकारने कायम ठेवली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून, बुधवारी (ता.8) संध्याकाळपासून कांदा विदेशात रवाना होण्यास सुरुवात झाल्याची माहिती सीमा शुल्क विभागाने दिली आहे. दरम्यान, 40 टक्के निर्यात शुल्क भरून, कांदा निर्यात खुली करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशानंतरही तांत्रिक अडचणींमुळे मागील तीन ते चार दिवसांपासून मुंबईतील जेएनपीटी बंदरात 250 कंटेनरमध्ये 7 हजार टन कांदा अडकून पडला होता. त्यानंतर आता कांदा विदेशात निर्यात (Onion Export) होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

काय होती नेमकी अडचण? (Onion Export From India)

ऐन लोकसभा निवडणुकीतच शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने अखेर केंद्र सरकारने तब्बल 150 दिवसांनी 40 टक्के निर्यात शुल्काची अट कायम ठेऊन कांदा निर्यातीला परवानगी दिली.यासाठी 3 मे रोजी केंद्र सरकारने अध्यादेशही काढला. मात्र तो 7 मे च्या संध्याकाळपर्यंत सीमा शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर अद्ययावत झालाच नाही. यामुळे जेएनपीटी बंदरातून निर्यातीसाठी पाठविलेले सुमारे सात हजार टन कांदा असलेले 250 कंटेनर बंदरातील ठिकठिकाणच्या सीएफएस परिसरात तीन दिवसांपासून अडकून पडले होते.

निर्यातदार, व्यापारी, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

नवी मुंबई येथील जेएनपीटी आणि सीमा शुल्क विभागाचे संकेतस्थळ तांत्रिक अडचणींमुळे अद्ययावत होण्यास विलंब झाल्यानेच निर्यातीसाठी पाठविलेल्या सुमारे सात हजार टन कांद्याचे 250 कंटेनर बंदरातच अडकून पडले होते. संकेतस्थळ सुरु झाल्याने निर्यातीचे कामही सुरळीतपणे सुरू झाल्याची माहिती न्हावा शेवा सीमा शुल्क विभागाने दिली आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी आणि ती उठविण्याच्या राजकीय खेळामुळे मात्र कांदा निर्यातदार, व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाला असल्याचे एका निर्यातदाराने म्हटले आहे.