हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक (Onion Export) झाले आहेत. केंद्र सरकारने कर्नाटकमधील बेंगलोर रोझ कांद्यावरील 40 टक्के निर्यातशुल्क हटवले आहे. मात्र, महाराष्ट्रातील कांद्यावरील निर्यात शुल्क ‘जैसे थे’ ठेवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आज (ता.31) लासलगावमधील खासगी बाजार समितीतील सुरु असलेले लिलाव बंद पाडले (Onion Export) आहेत. केंद्र सरकारच्या महाराष्ट्र विरोधी धोरणाचा शेतकऱ्यांनी निषेध केला आहे.
राज्यातील कांदा उत्पादकांवर अन्याय (Onion Export Lasalgaon Farmers)
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात (Onion Export) शुल्काबाबात मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटकातील गुलाबी कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क हटवण्यात आले आहे. याचा थेट परिणाम आज नाशिकच्या लासलगाव येथील खासगी बाजार समितीत दिसून आला आहे. केंद्र सरकार हे महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी यावेळी केला आहे. परिणामी, आज शेतकऱ्यांनी लासलगाव खासगी बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत.
40 टक्के निर्यातशुल्क हटवण्याची मागणी
केंद्र सरकार हे गुजरात व कर्नाटकला वेगळा न्याय देते. मग महाराष्ट्रावर अन्याय का? असा सवालही आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसांत कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क न हटवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्र सरकार अद्याप कांदा उत्पादक शेतक-यांकडे लक्ष देत नसल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. आज लिलाव बंद पाडण्याअगोदर लासलगाव बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त 2000 ते सरासरी 1600 रुपयांचा भाव मिळाला.
रोझ कांद्याची टिकवणक्षमता कमी
दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार, बेंगलोरच्या रोझ कांद्याचे उत्पादन प्रामुख्याने कर्नाटकातील राज्यातील कोलार जिल्ह्यात अधिक प्रमाणावर होते. यासह बेंगलोर भागातही उत्पादन होते. या कांद्याला भौगोलिक चिन्हांकन प्राप्त झाले आहे. या कांद्याची टिकवणक्षमता कमी आहे. त्याची निर्यात प्रामुख्याने सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका आदी देशात होत असते. इतर कांद्याच्या तुलनेत उत्पादन अल्प असल्याने या कांद्याची निर्यात होते. तर स्थानिक बाजारात मागणी नसल्याने निर्यात महत्वाची असते.