हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. कारण कांद्यावरील निर्यातबंदी (Onion Export) हटवून देखील कांद्याचे दर वाढलेले नाही. याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. परिणामी, कांदा निर्यात बंदीमुळे परकीय चलनात 649 कोटी रुपयांची तूट आली आहे. तर 8 लाख 17 हजार 530 मेट्रिक टन कांद्याची निर्यात (Onion Export) कमी झाली आहे.
वर्षनिहाय निर्यात आकडेवारी (Onion Export From India)
कांदा निर्यातीबाबत (Onion Export) केंद्र सरकारकडून नेहमीच धरसोडीचे धोरण अवलंबले जात आहे. याचा परिणाम देशाच्या परकीय चलनावर होत आहे. गेल्या आर्थिक वर्षात परकीय चलनात 649 कोटी रुपयांची तूट तर 8 लाख 17 हजार 530 मेट्रिक टन कांद्याची निर्यात कमी झाल्याची बाब एपीडाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.
2023 ते 24 या आर्थिक वर्षामध्ये 17 लाख 7 हजार 998 मेट्रिक टन कांदा निर्यात झाला आहे. यातून 3 हजार 874 कोटी रुपयांचे चलन मिळाले आहे. तर 2022 ते 23 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 25 लाख 25 हजार 258 मेट्रिक टन कांदा निर्यात झाला होता. यातून 4 हजार 522 कोटी रुपयांचे चलन मिळाले आहे. अर्थात यंदा कांदा निर्यात चलनात 649 कोटी रुपयांची तूट झाली आहे.
निर्यातबंदी उठवण्याची मागणी
दरम्यान, यावर्षी कांद्यावर निर्यातबंदी लावल्यामुळे कांद्याची निर्यातही यंदा कमी झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान पाहता केंद्र सरकारने तातडीने अटी शर्ती न लावता संपूर्ण कांदा निर्यात बंदी उठववी, अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यापासून वेळोवेळी मागणी करुन देखील सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली नाही. परिणाम शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.