हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा निर्यात (Onion Export) मूल्यावरुन सध्या भारत व शेजारील देश असलेल्या पाकिस्तानमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. कांदा निर्यात अधिक करता यावी, यासाठी पाकिस्तानने जाणीवपूर्वक भारतापेक्षा कमी निर्यात मूल्य ठेवले आहे. सध्याच्या घडीला भारताने कांदा निर्यातबंदी हटवल्यानंतर एका मेट्रिक टनासाठी 550 डॉलर इतके किमान कांदा निर्यात मूल्य लागू केले आहे. त्याचवेळी पाकिस्तानने आपल्या 700 डॉलर कांदा निर्यात (Onion Export) मूल्यावरून, प्रति एक मेट्रिक टनासाठी निर्यात मूल्यामध्ये 325 डॉलरपर्यंत कपात केली आहे.
विदेशी बाजारपेठेवर पकड सैल (Onion Export From India)
सहा महिन्यांपासून भारतातून कांदा निर्यात (Onion Export) बंदी लादल्याने बांगलादेशसह मलेशिया, श्रीलंका आदी देशांतील बाजारपेठेत चीन व पाकिस्तानने आपले स्थान भक्कम केले होते. मात्र, यामुळे भारतातील कांदा उत्पादकांची विदेशी बाजारपेठेतील पकड सैल झाली होती. भारताने कांदा निर्यातबंदी केल्याने याचा फायदा घेत पाकिस्तानने निर्यात शुल्क वाढवले होते. त्यामुळे पाकिस्तान मालामाल झाला होता. मात्र, भारतातून मंगळवारपासून कांद्याची विदेशवारी सुरू होताच पाकिस्तानने निर्यात शुल्क निम्म्यावर केले असल्याचे समोर आले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात टिकून राहण्याचा प्रयत्न
भारतातून 2022-23 या वर्षात 25 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली होती. त्यामुळे भारत चीननंतर सर्वांत मोठा कांदा उत्पादक देश बनला. मात्र, भारतातील निर्यातबंदीमुळे चीननंतर पाकिस्तानच्या कांद्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न केला. त्यात काहीसे यशही आले. परंतु, आता भारतातून कांदा निर्यात सुरू झाल्याने, पाकिस्तानने स्पर्धेत टिकण्यासाठी निर्यात शुल्क निम्म्यावर केले असल्याचे पाहायला मिळत आहे.
भारतीय निर्यात शुल्क अधिक
पाकिस्तानने 325 डॉलर प्रति टन निर्यात शुल्क केले असले तरी भारताचे निर्यातशुल्क मात्र 550 डॉलर आहे. त्यामुळे पाकिस्तानचा माल कमी भावात जाईल. स्पर्धेत टिकण्यासाठी भारताने देखील निर्यातशुल्क कमी करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. भारत सरकारने निर्यात शुल्क 550 डॉलर केले तसेच 40 टक्के निर्यात शुल्कहीं भरावे लागेल. शिवाय कांटा उत्पादकांना ऍडव्हान्स पेमेंट करायचे आहे. त्यामुळे आंतराष्ट्रीय बाजारपेठेत टिकण्यासाठी भारतालाही निर्यातशुल्क कमी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, पाकिस्तान आपल्यापेक्षा थेट अर्ध्या किमतीत इतर देशांना माल पाठवत आहे.