हॅलो कृषी ऑनलाईन : 29 ऑक्टोबर 2023 पासून सरकारने देशातंर्गत कांद्याचे दर (Onion Export) नियंत्रणात ठेवण्यासाठी 800 डॉलर प्रति टन निर्यात मूल्य लागू केले आहे. त्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या 21 दिवसांमध्ये कांदा निर्यातीत 85 टक्क्यांनी घट (Onion Export) झाल्याचे समोर आले आहे. यावर्षी 1 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत केवळ 19 हजार 347 टन कांद्याची निर्यात होऊ शकली आहे. दुबईस्थित कृषी व्यापार कंपनी सिल्करूट डॉट एजीच्या आंतरिक आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
भारतातून प्रामुख्याने बांग्लादेश, नेपाळ, संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका यांसारख्या देशांमध्ये कांदा निर्यात (Onion Export) केला जातो. सिल्करूटच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांमध्ये देशातील कांदा निर्यात ही मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत खूपच नगण्य स्वरूपात राहिली आहे. बांग्लादेशला या कालावधीत केवळ 263 टन कांदा निर्यात होऊ शकला आहे. मागील वर्षी याच कालावधीत 49 हजार टन कांदा बांग्लादेशात निर्यात करण्यात आला होता. नेपाळला या 21 दिवसांमध्ये केवळ 88 टन कांदा निर्यात होऊ शकला आहे. मागील वर्षी याच कालावधीत नेपाळला 8654.5 टन कांदा निर्यात करण्यात आला होता. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 29 ऑक्टोबरपासून 800 डॉलर प्रति टन इतके प्रचंड प्रमाणात निर्यात मूल्य लागू केले आहे. त्यातच यावर्षी पावसाअभावी खरीप कांदा बाजारात उशिरा दाखल झाला असून, यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्यातीला हा झटका बसला असल्याचे सिल्करूटने म्हटले आहे.
हळूहळू आवक वाढणार (Onion Export In November 2023)
यावर्षी पावसाअभावी कांदा काढणीस एक महिना उशीर झाल्याने आणि बांगलादेश, नेपाळसह पश्चिम आशियाई देशांमधून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत कांदा दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हळूहळू नवीन कांद्याची आवक वाढण्यास सुरुवात होईल. त्यानंतर रब्बी आणि उन्हाळी अशा दोन टप्प्यात देशातील अनेक भागातून मोठ्या प्रमाणात कांदा आवक सुरु होईल. त्यामुळे 2024 या वर्षाच्या पहिल्या काही दिवसांमध्ये चांगली आवक होईल. असे व्यापारी वर्गाकडून सांगितले जात आहे.