हॅलो कृषी ऑनलाईन : अफगाणिस्तानमधून पंजाबमार्गे देशात कांद्याची आयात (Onion Import) वाढली असल्याचे समोर आले आहे. पंजाबमधील एका आघाडीच्या वृत्तपत्राने आपल्या वृत्तात याबाबत खुलासा केला आहे. महिनाभरापूर्वी देशात अफगाणिस्तानमधून दररोज केवळ सरासरी तीन कांद्याचे कंटेनर-ट्रक येते होते. मात्र आता त्यात वाढ होऊन, दररोज सरासरी 15 कंटेनर-ट्रक कांदा अफगाणिस्तानातून भारतात (Onion Import) येत आहे. ज्यामुळे देशातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या कांदा दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अटारी सीमेवरील चेक पोस्टचे व्यवस्थापक सतीश ध्यानी यांनी सांगितले आहे की, सध्या अफगाणिस्तानमधून भारतात दररोज 15 कांद्याचे कंटेनर-ट्रक येत आहेत. जे महिनाभरापूर्वी केवळ तीन कंटेनर-ट्रक येत होते. तर चेक पोस्टवर आज (ता.24) अफगाणिस्तानमधून 61 कंटेनर-ट्रक आल्याचे आढळले आहे. ज्यामध्ये फळे, औषधी वनस्पती, ताजी फळे जसे की द्राक्षे, डाळिंब, सफरचंद आणि इतर उत्पादने आढळून आली आहेत. तर कांद्याच्या एका व्यापाऱ्याने सांगितले आहे की अफगाणिस्तानमधून आयात केलेला हा कांदा (Onion Import) दिल्लीसह उत्तर भारतातील बाजारपेठांमध्ये आणण्यात येत आहे. उत्तर भारतातील किरकोळ बाजारात सध्या कांदा 60 रुपये प्रति किलोपर्यंत विकला जात आहे.
केंद्राकडून सारवासारव (Onion Import In India)
मात्र केंद्र सरकारच्या परकीय व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) याबाबत सारवासारव करताना कांदा निर्यातीबाबत एक अधिसूचना काढली आहे. ज्यात देशातून कांदा निर्यात सुरु असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. 29 ऑक्टोबर पूर्वी निर्यात करार करण्यात आलेला एक कंटेनर सीमा शुल्क अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. हा कंटेनर आता 30 नोव्हेंबर पूर्वी निर्यात केला जाऊ शकतो, असे डीजीएफटीने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
दरम्यान, 28 ऑक्टोबर 2023 रोजी केंद्र सरकारने देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा निर्यात मूल्यात वाढ करत, ते 800 डॉलर प्रति टन इतके निर्धारित केले होते. जे 31 डिसेंबर 2023 पर्यंत कायम असणार आहे. ज्यामुळे आता या कंटनेरच्या निर्यातीसाठी 29 ऑक्टोबर पूर्वीचे निर्यात शुल्क आकारले जाणार आहे. असेही डीजीएफटीने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे.