Onion Subsidy : राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पन्न घेतले जाते. परंतु, सतत कांद्याचे दर घसरलेलेच असतात. कांद्याला पाहिजे तसा हमीभाव मिळत नसल्याने आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आले आहेत. राज्य सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ४६५ कोटी ९९ लाखांची अनुदानाची रक्कम जाहीर केली होती.
अनुदानाची रक्कम वाढली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता अनुदानाची रक्कम ४६५ कोटी ९९ लाखांवरून ८४४ कोटी ५६ लाखांवर पोहोचली आहे अशी माहिती पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. ई पीक पाहणी’ची नोंदणी तसेच इतर अटी काढून टाकल्या आहेत त्यामुळे ही रक्कम वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यामधील बाजार समित्यांत १ लाख ७७ हजार ७०६ अर्ज प्राप्त असले तरी उताऱ्यावर ई पीक पेरा नसल्याने २९ हजार २८८ अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून त्यांना लवकरात लवकर लाभ द्यावा, अशा मागणीची लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती.
शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
तसेच ई पीक पेऱ्यावर कांद्याची नोंद नसेल अशा ठिकाणी तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांची समिती गठित करून स्थळपाहणी केल्यावर कांदा लागवडीची नोंद उताऱ्यावर करून ते उतारे अनुदानासाठी ग्राह्य धरावेत, असा निकष केला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.