Organic Farming : अलीकडच्या काळात अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसत आहेत. सेंद्रिय शेती मधून येणाऱ्या पिकाला बाजारात भावसुद्धा चांगला मिळत असल्याने यावर भविष्यात मागणी वाढण्याची शक्यता आहे. सेंद्रिय शेतीसाठी जमिनीतील सेंद्रिय घटक फार महत्वाची भूमिका पार पाडतात. आता जमिनीतील हे सेंद्रिय घटक कसे वाढवायचे याबाबत आज आपण माहिती जाणून घेऊयात.
उष्ण हवा आणि कमी पाऊस यांमुळे अधिकतर क्षेत्रातील सेंद्रिय घटकांचे भस्मीकरण जलद गतीने होते. सेंद्रिय भागाचे विघटन व भस्मीकरण होणे ही बाब महत्त्वाची आहे. पण उष्ण हवेत ही प्रक्रिया फार जलद होते. त्यामुळे सेंद्रिय घटक तयार होण्याच्या क्रियेत समतोलपणा राहत नाही. हा समतोलपणा येण्यासाठी खालील उपायांचा अवलंब करावा.
१) जमिनीस अधिक प्रमाणात सेंद्रिय खते किंवा भरखते पुरविली पाहिजेत. भरखते ही एकाच वेळी भरपूर प्रमाणात न देता ती प्रत्येक पिकास टप्प्याटप्याने परंतु नियमितपणे द्यावीत.
२) जमिनीतील सेंद्रिय घटक नैसर्गिक हवामान बदलावर अवलंबून असल्याने त्याचे प्रमाण वाढविणे अशक्यप्राय आहे. परंतु त्याचा समतोल राखला जाईल यासाठी कंपोस्ट खत, शेणखत, पालापाचोळा, पिकांचे अवशेष वगैरेंचा वापर करावा.
३) धैंचा, ताग, शेवरी, बरबडा तसेच पार्थेनियम यासारख्या हिरवळीच्या खतांची लागवड करून ती पिके फुलोन्यात येताच जमिनीत गाडावीत. हिरवळीची पिके पेरताना व नांगरून टाकताना फॉस्फेटयुक्त खते द्यावीत किंवा हिरवळीचे पीक गाडल्यानंतर घेण्यात येणाऱ्या पिकांच्या स्फुरदाची खत मात्रा हिरवळीच्या खतात द्यावी.
४) कडधान्यवर्गीय गवते उदा. टाकळा, तरवड, बरबडा फुलोऱ्यात येण्यास सुरुवात होत असताना अथवा पार्थेनियमसारखी पिके फुलोऱ्यापूर्वी शेतात गाडल्यास त्यापासूनही जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविता येते.
५) सुबाभूळ अथवा गिरीपुष्प यांसारखी झाडेसुद्धा बांधावर लावून त्यांची एक मीटरवर वारंवार छाटणी करून त्यांच्या कोवळ्या फांद्या शेतात नुसत्या पसरल्या तरीही त्यांचा तिहेरी फायदा होतो. पहिला फायदा जमिनीवर आच्छादन करता येते. त्यामुळे पावसाच्या थेंबाने होणारी मातीची धूप थांबविता येते. तसेच जमिनीत जास्त पाणी मुरविता येते व बाष्पीभवनामधून उडून जाणाऱ्या पाण्याचे संवर्धन करता येते. तसेच या फाद्यांचे कर्ब- नत्राचे गुणोत्तर कमी असल्यामुळे त्याचे दीड ते दोन महिन्यांत भस्मीकरण होऊन पुढील पिकास अन्नद्रव्यांचा चांगला पुरवठा होतो व रासायनिक खताची मात्रा कमी करता येते. भस्मीकरणाची क्रिया सावकाश करण्यासाठी जमिनीवर पालापाचोळ्याचा थोडा जास्त थर राहू द्यावा, यालाच इंग्रजीत ऑरगॅनिक मल्च (सेंद्रिय आच्छादन) असे म्हणतात.
६) जमिनीची कमीत कमी मशागत केल्यास सेंद्रिय पदार्थाचा -हास होत नाही.
एकंदरीत जमिनीतील सेंद्रिय घटक हे पीक उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत व त्याची घट वरचेवर भरून काढणे अत्यावश्यक आहे. ज्या शेतीमध्ये जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण कमी होत जाते ती शेती किफायतशीर होऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.