वेळीच लक्ष द्या …! म्हशींमधील स्फुरदच्या कमतरतेमुळे , उन्हाळयात उद्भवतो ‘हा’ आजार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनॊ बऱ्याचदा उन्हाळयात जनावरांना लालसर रंगाची लघवी होते. या आजाराला ‘लाल मूत्र रोग’ असे म्हणतात. हा रोग म्हशींमध्ये स्फुरदच्या कमतरतेमुळे होतो. या आजाराचा प्रादुर्भाव जास्त दुधाचे उत्पादन देणाऱ्या म्हशी आणि शेवटच्या टप्प्यातील गाभण म्हशींमध्ये दिसून येतो. या आजारामुळे दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात घट दिसून येते. औषध उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. वेळेत उपचार न केल्यास म्हशींना रक्तक्षयासारखा आजार होऊ शकतो. त्यामुळे या आजाराकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. या आजाराची बाधा साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील म्हशींमध्ये तिसऱ्या ते सातव्या वेतामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते.

काय आहेत रोग होण्यामागची कारणे
–आहारातील स्फुरदची कमतरता हे या आजाराचे प्रमुख कारण आहे.
–दूध उत्पादनासाठी तसेच गर्भातील वासराची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी स्फुरदची गरज असते.
–महाराष्ट्रातील जमिनीत स्फुरदचे प्रमाण कमी किंवा अगदी नगण्य आहे.
–जनावरांना खाद्यासाठी दिला जाणारा चारा हा याच मातीत उगवलेला असल्याने पिकात स्फुरदची कमतरता निर्माण होते.
–परिणामी म्हशी लाल मुत्र आजारास बळी पडतात.
–त्यातही वाळलेल्या चाऱ्यामध्ये स्फुरदचे प्रमाण अगदी नगण्य असते.

या आजाराची लक्षणे
–या आजाराचे प्रमुख लक्षण म्हणजे लाल, काळसर किंवा कॉफीच्या रंगाची लघवी होते.
–म्हैस शेण टाकताना कुंथुन बाहेर टाकतात.
–खाणेपिणे मंदावते, वजन घटते, अशक्तपणा वाढून जनावर मलूल बनते.
–दूध उत्पादन घटते.
–शरीराचे तापमान जरी सर्वसाधारण असले तरीही नाडीचा आणि श्वसनाचा वेग वाढतो.
–तीव्र स्वरूपाचा रक्तक्षय होतो.
–डोळ्यातील श्लेम पटल पांढरे किंवा कावीळ झाल्यास पिवळसर पडतात.
–बाधित म्हशींचा उपचार केला नाही तर तीव्र स्वरूपाचा रक्तक्षय होवून ४-५ दिवसात बाधित म्हशी दगावण्याची शक्यता असते.

कसे करावे निदान
–हा आजार प्रामुख्याने नवीन विलेल्या म्हशींमध्ये शेवटच्या दोन महिन्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो.
–तसेच गाभन जनावरांमध्ये शेवटच्या तीन महिन्यामध्ये या आजाराची बाधा दिऊन येते.
–या आजाराची बाधा डिसेंबर ते जुले च्या दरम्यान आढळून येते.
–स्फुरद खनिजचे इंजेक्शन ३ ते ५ दिवस दिल्यास बाधित म्हशी उपचारास चांगला प्रतिसाद देतात.
–रक्तामधील स्फुरदचे प्रमाण ४-६ ग्रॅम प्रति १०० मिली रक्त किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास प्रयोगशालेत तपासणी करून घ्यावी.

औषधोपचार
–या आजाराचे तत्काळ निदान करून पशुवैद्यकांकडून उपचार करून घेतल्यास बाधित म्हशींना वाचवता येते.
–यामध्ये प्रामुख्याने स्फुरद खनिजयुक्त इंजेक्शन, सलाईन, ब जीवनसत्व इंजेक्शन, रक्त वाढविण्यासाठी टॉनिक वापरल्यास म्हशी उपचारास प्रतिसाद देऊन आजारातून बऱ्या होतात.
–परंतु उपचार सुरु करण्यास विलंब झाल्यास उपचारांती बाधित म्हशींमध्ये तीव्र स्वरूपाचा रक्तक्षय आणि कावीळ होवून मरतुक होऊ शकते.
–जर बाधित म्हशींमध्ये हिमोग्लोबिन ५ ग्रॅम/लिटर पेक्षा कमी झाल्यास अशा म्हशींमध्ये निरोगी दाता म्हशीचे किमान १.५ ते २ लिटर रक्त चढविण्यात यावे.

प्रतिबंध
–चांगली दुग्ध उत्पादकता असलेल्या म्हशींच्या आहारातील स्फुरद खनिजाचे व्यवस्थित नियोजन केल्यास लाल मुत्र या आजाराला आळा घालता येवू शकतो. –गाभण व दुभत्या म्हशींच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन करून पुरेशा प्रमाणात स्फुरद आहारात उपलब्ध करून दिल्यास गर्भात वाढणाऱ्या वासराच्या किंवा दूध निर्मितीसाठी लागणाऱ्या स्फुरद खनिजाची गरज भरून निघेल आणि अशा म्हशी या आजारास बळी पडणार नाहीत.
–म्हशींना आहारात वळलेला चारा, हिरवा चारा व खुराक योग्य प्रमाणात दिल्यास तसेच नियमित ५० ग्रॅम खनिज मिश्रणाचा पुरवठा केल्यास हा आजार पूर्णपणे टाळता येतो.
–आहारात कॅल्शियम आणि स्फुरद यांचे प्रमाण २:१ राहील याचीही काळजी घ्यावी.

संदर्भ : ऍग्रो वन

Leave a Comment

error: Content is protected !!