Pokkah Boeng Of Sugarcane: ऊस पिकामध्ये वाढतोय ‘पोक्का बोइंग’ रोगाचा प्रादुर्भाव; करा तज्ज्ञांनी सुचविलेले ‘हे’ उपाय!

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्याच्या परिस्थितीत ऊस पिकामध्ये ‘पोक्का बोइंग’ (Pokkah Boeng Of Sugarcane) रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे. मागील 15 दिवसांपासून सततच्या रिमझिम पडणार्‍या पावसामुळे (Rainfall) बऱ्याच ठिकाणी ऊस शेतात पाणी साचल्याने पिकांच्या सभोवताली सापेक्ष आर्द्रता वाढून तापमान कमी झालेले आहे. त्यामुळे उसावरील या रोगाचा (Sugarcane Disease) प्रादुर्भाव वाढत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV Parbhani) तज्ज्ञांनी (Agriculture Expert) यासाठी काय काळजी घ्यायची आणि या रोगाचे (Pokkah Boeng Of Sugarcane) नियंत्रण कसे करायचे याविषयी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, जाणून घेऊ या त्याविषयी.

‘पोक्का बोइंग’ रोगाचा प्रादुर्भाव (Pokkah Boeng Of Sugarcane)

या रोगाचा प्रादुर्भाव ‘फ्यूजॅरियम मोनिलीफॉरमी’ या बुरशीमुळे (Fungal Disease) होतो. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पिकातील आर्द्रता वाढून तापमान कमी झाल्यास ही बुरशी कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर उसाच्या पोंग्यात वाढते आणि रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगास कारणीभूत बुरशीचा प्रसार हवेद्वारे होतो.

‘पोक्का बोइंग’ रोगाची लक्षणे (Pokkah Boeng Symptoms)

वर नमूद केल्याप्रमाणे अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यास या रोगास कारणीभूत असलेल्या बुरशीची लागण प्रथमता उसाच्या शेंड्यातील कोवळ्या पानावर दिसून येते. सुरुवातीस पोंग्यातील तिसऱ्या व चौथ्या पानांच्या बेचक्यात पांढरट पिवळसर चट्टे दिसून येतात तसेच रोगाची लागण झालेल्या पानावर सुरकुत्या पडून पाने आकसतात. रोगाची तीव्रता वाढल्यानंतर उसाची पाने एकमेकात वेणीसारखी गुरफटतात. पाने एकमेकांत गुरफटल्याने पिकाचे पोषण व्यवस्थित होत नाही परिणामी उसाचे कांडे आखूड व वेडेवाकडे होतात.

अधिक प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास पोंगेमर किंवा शेंडा कुज सुध्दा दिसून येतो. शेंडा कुज झालेल्या उसातील शेंड्याचा जोम नष्ट झाल्याने उसावरील डोळ्यातून पांगश्या फुटतात व कालांतराने असे ऊस वळतात. रोगट उसाच्या कांड्या आखूड झाल्याने व पांगश्या फुटल्याने उसाच्या उत्पन्नात घट येते. या रोगामुळे उसाच्या बेटातील रोगग्रस्त फुटव्यांचेच नुकसान होते तथापि बाधित न झालेल्या उसाचे नुकसान होत नाही. ऑगस्ट महिन्यानंतर आर्द्रता कमी आणि तापमान वाढल्याने या रोगाची तीव्रता हळूहळू कमी होत जाते.

नियंत्रण उपाय (Pokkah Boeng Of Sugarcane Control Measures)

  • शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करावा.
  • शेंडे कुज व पांगश्या फुटलेले ऊस आढळून आल्यास ते त्वरित नष्ट करावेत.
  • या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास लगेचच कार्बेन्डाझिम 12%+ मॅन्कोझेब 63% डब्लूपी 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्‍लोराईड 50% डब्लूपी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी सोबत उच्च दर्जाचे स्टिकर मिसळून 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात.

अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी दूरध्वनी क्रमांक 02452 – 229000 किंवा व्हाट्सॲप क्रमांक 8329432097 यावर संपर्क करावा.