हॅलो कृषी ऑनलाईन: नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या (Pik Vima) होणाऱ्या नुकसानीपासून शेतकर्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pradhanmantri Pik Vima Yojana) राबवण्यात येत आहे. फक्त एक रुपया हिस्सा भरून सर्वसमावेशक पीक विमा योजनेचा शेतकर्यांना (Scheme For Farmers) लाभ घेता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या योजनेचा (Pik Vima) सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने (Agriculture Department) केले आहे.
पालघर जिल्ह्यात भात, नाचणी व उडीद ही पिके योजनेंतर्गत अधिसूचित आहेत. भात, नाचणी, उडीद पिकासाठी निर्धारित केलेल्या पीक विमा हप्त्याच्या शेतकरी हिस्शाची रक्कम अनुक्रमे रुपये 1035.30/-, 400/- व 500 पैकी फक्त एक रुपया भरून शेतकर्यास या योजनेत (Pik Vima) सहभागी होता येणार आहे.
उर्वरित शेतकरी हिस्शाची रक्कम राज्य शासन भरणार आहे. त्यासाठी शेतकर्यांना 15 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली आहे. या योजनेमध्ये सहभागी होणार्या शेतकर्याने आपला सातबारा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड, पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज घेऊन हप्ता भरून सहभाग घ्यावा.
हप्ता भरलेली पोचपावती जपून ठेवावी. सी.एस.सी. केंद्र आपले सरकार पोर्टलच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभागी होऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे साहाय्य घेऊ शकता.
शेतकर्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये जास्त संख्येने सहभागी व्हावे, याकरिता जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, विमा कंपनी प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा.
पीक विमा अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा
- आधार कार्ड व बँक खात्यात बहुतेक नावे सारखी असतात. पण सातबारा उताऱ्यावर कधीकधी नावात किरकोळ बदल असतो. असं असलं तरी विमा अर्ज भरण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. नावात थोडासा बदल असल्यास हरकत नसेल, पण पूर्णनाव, आडनाव वेगळे असल्यास ते चालणार नाही.
- CSC केंद्रावर अर्ज भरताना शेतकर्यांनी प्रति अर्ज केवळ 1 रुपया शुल्क देणे अपेक्षित आहे. प्रति शेतकरी 40 रुपये एवढे शुल्क विमा कंपनी CSC चालकांना देणार आहे.
याव्यतिरिक्त CSC चालक अतिरिक्त शुल्काची मागणी केल्यास याबाबतची तक्रार पुढील टोल फ्री क्रमांकावर आणि व्हाट्सअप नंबरवर नोंदवा. टोल फ्री नंबर – 14599/14447, व्हाट्स अप नंबर :- 9082698142
- अर्ज करताना शेतकर्यांना आधार कार्ड, बँक पासबुक फोटो, पीक पेरयाचे घोषणापत्रही सोबत बाळगणं आवश्यक आहे.
- शेतकर्यांनी शेतात लागवड केलेल्या पिकाचा आणि लागवड असलेल्या क्षेत्राचाच विमा उतरवावा. विमा घेतलेले पीक प्रत्यक्षात शेतात आढळले नाही तर विमा अर्ज नामंजूर करण्यात येईल.
- प्रधानमंत्री पीक विमा (Pik Vima) योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज केला याचा अर्थ तुम्ही लाभास पात्र ठरलात असा होत नाही.