पंतप्रधान मोदींनी आश्वासन पाळले नाही म्हणताच पद्मश्री विजेत्या राहीबाई पोपेरेचें भाषण अर्ध्यातच रोखले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : राहीबाई पोपेरे (Beejmata Rahibai Popere) यांना देशात बिजमाता म्हणून ओळखलं जात. मागच्याच वर्षी राहीबाई यांचा भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. मात्र आता त्यांना एका कार्यक्रमावेळी अतिशय वाईट वागणूक मिळाल्याचं समोर आलं आहे. भाषण करतेवेळी पोपेरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही असं वक्तव्य केल्याने त्यांना अर्ध्यावरच रोखून त्यांचं भाषण थांबवण्यात आल्याचा प्रकार नागपूर येथे घडला आहे.

इंडियन सायन्स काँग्रेसच्या (Indian Science Congress) मंचावर उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांकडून ‘आता पुरे झाले’ असे म्हणत राहीबाई पोपेरे यांचे भाषण अर्ध्यावरच रोखण्यात आले. गुरुवारी (ता. ५) सायंकाळी फार्मर्स सायन्स काँग्रेसनंतर (Farmer Science Congress) आयोजित वुमन सायन्स काँग्रेसच्या उद्‌घाटन सत्रात हा प्रकार घडला. पोपेरे यांना मिळाल्या या वागणुकीमुळे सदरील कार्यक्रम देशाचा कि भाजपचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात राहीबाई पोपेरे यांच्या अध्यक्षतेत फार्मर सायन्स काँग्रेसचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. ५) पार पडले. त्यानंतर सायंकाळी महिला सायन्स काँग्रेसच्या उद्‌घाटन सोहळ्याला देखील त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. व्यासपीठावर नागपूर विद्यपीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, भाजपप्रणीत शिक्षक मंचच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सल्लागार डॉ. निशा मेंदिरट्टा भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. विजयालक्ष्मी सक्‍सेना उपस्थित होत्या.

राहीबाही यांनी भाषणात विविध मुद्दे मांडले. यावेळी बोलताना त्यांनी आपण पंतप्रधान मोदी यांनी आत्तापर्यंत दोन वेळा भेटल्याचे सांगितले. जेव्हा मी मोदींना पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांनी माझे गाव कोंभलने (जि. अहमदनगर) येथे भेट देण्याचं आश्वासन दिले होते. या भेटीत ते पर्यावरण व बीज संरक्षणविषयक काम पाहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होत. मात्र ते काही आले नाहीत. यानंतर २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी मी राष्ट्रपती भवन येथे गेली तेव्हा मी पंतप्रधान मोदी यांना दुसऱ्यांदा भेटले. दुसऱ्या भेटीत मी त्यांना तुम्ही माझ्या गावी येण्याचे आश्‍वासन दिले होते; मग आले का नाही अशी विचारणा केली असं पोपेरे यांनी सांगितले. Rahibai Popere

जबाबदार कोणाला धरायचे असा प्रश्न?

माझे कोंभलने हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. रस्ते, वीज, पाण्यासारख्या मूलभूत सुविधांची पूर्ततादेखील गावात झालेली नाही, असे राहिबाईंनी म्हणताच डॉ. कल्पना पांडे यांनी त्या भाषण करीत असलेले ठिकाण गाठत त्यांना आता पुरे असे सांगत त्यांचे भाषण थांबविले. यामुळे उपस्थितांमध्ये उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. एखाद्या पद्मश्री विजेत्या व्यक्तीला जर अशी वागणूक मिळत असेल, आपले म्हणणे मांडताना अडवले जात असेल तर याला जबाबदार कोणाला धरायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

error: Content is protected !!