Rain Update : राज्यात आज अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड या भागामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर तमिळनाडूमध्ये असलेली वाऱ्याची चक्रीय स्थिती दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या केरळ किनारपट्टी जवळ आहे त्यामुळे राज्यात हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान?
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कोल्हापूर सह सातारा, सांगली, कराड या भागामध्ये अवकाळी पाऊस झाल्यामुळे काही अंशी पिकांना या पावसाचा फायदा झाला आहे मात्र हाताशी आलेली पिके जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सांगलीच्या आष्टा, जत या भागामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष व डाळिंब ही पिके घेतली जातात. त्यामुळे अवकाळी पावसामुळे या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. ऊसतोड मजुरही या भागामध्ये दाखल झाले आहेत. या ऊसतोड मजुरांच्या झोपडीत पाणी शिरल्याने तारांबळ झाली.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे ऊस पिकाला या पावसाचा फायदा होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यातील पूर्वेचा भाग तसेच पश्चिमेच्या घाट परिसरात पाऊस झाला आहे. हा पाऊस ऊस पिकासाठी फायदेशीर ठरणार आहे. भात पिकासाठी सुद्धा हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे कारण राज्यात मान्सून उशिरा दाखल झाल्याने भात पिकाची लागवड देखील या भागात उशिरा करण्यात आली होती.
मात्र लवकर लागवड केलेल्या भात पिकासाठी नुकसानकारक ठरणार आहे. कारण काढणीस आलेले भात पीक गळून पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात भात पिकाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे हा अवकाळी पाऊस काही ठिकाणी फायदेशीर तर काही ठिकाणी नुकसानकारक ठरला आहे.
रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. महाड, पोलादपूर, माणगाव, रोहा तालुक्यात दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे भात पिकाचे नुकसान झाले आहे. कापणी केलेल्या भातपिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. भात पीक वाचवण्यासाठी शेतकरी धावपळ करत आहेत.