Rain Update : राज्यात गेल्या काही दिवसापासून पाऊस गायब झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा का होईना केलेली पेरणी आता वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्यात पाऊस उशिरा दाखल झाल्याने शेतकर्यांनी उशिरा पेरणी केली होती. मात्र गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून पावसाचा खंड पडल्यामुळे पिके जळू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच हवामान विभागाने पुढील पाच दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या संकटात आणखीनच भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बहुतांश धरणामध्ये पाणीसाठा देखील कमी झाला आहे. राज्याचे अनेक भागात गेल्या दोन ते अडीच महिन्यात सरासरीपेक्षा अतिशय कमी पावसाची नोंद झालेली आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या पावसाची गरज निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात देखील पाऊस पडण्यास पोषक वातावरण नाही. त्यामुळे पुढील पाच दिवसात राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे
राज्यात पुढील दहा दिवस कोरडे जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पाण्याची योग्य नियोजन करावे असे आवाहन, हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होईल, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. प्रशांत महासागरात अल निनोचा प्रभाव दिसून येणार आहे. शेतकऱ्यासाठी ही चिंतेची बाब आहे.
राज्यात दुष्काळ जाहीर करावा – सुप्रिया सुळे
महाराष्ट्रात जुन, जुलै या महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातच या ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे ६८ टक्क्यांनी पाऊस कमी आहे. दि. १ ते १८ ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. ही परिस्थिती भीषण असून शेतकऱ्यांचे हातचे पीक निघून गेले आहे. हे पाहता या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे. यासोबतच महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. परिस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा. तसेच पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जनावरांसाठी चारा छावण्या आणि इतर दुष्काळी कामे हाती घेण्यासंदर्भात तातडीने सकारात्मक विचार करुन अंमलबजावणी करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर केली आहे.